केरळ अपघात – कॅ. दीपक साठेंच्या आई-वडिलांनी गृहमंत्र्यांकडे व्यक्त केली अपेक्षा

Home minister Anil deshmukh condoles captain deepak sathe’s family - केरळमधील विमान अपघातात कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी काय करता येईल याची सूचना त्यांच्या वृद्ध आई-वडिलांनी केली आहे.

Update: 2020-08-09 01:39 GMT

केरळमधल्या कोझीकोड विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात मृत्यु झालेले पायलट कॅप्टन दीपक साठे यांच्या कुटुंबियांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरमधल्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांचे आई वडील आणि नातेवाईक नागपूरात राहतात.

वैमानिक विंग कमांडर दीपक यांचे वयोवृद्ध वडील कर्नल वसंत साठे, आई नीला साठे तसेच नातेवाईक यावेळी उपस्थित होते. दुबईहून केरळमधील कोझीकोड येथील करिपूर विमानतळावर आलेले एअर इंडियाचे विमान लँडिंगवेळी धावपट्टीवरुन अचानक घसरल्यानंतर दरीत कोसळले. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्राचे सूपुत्र पायलट साठे एनडीएमध्ये कार्यरत होते. अपघात झालेले विमान त्यांनी दोन वेळा उतरवण्याचा प्रयत्न केला होता. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी विमान उतरवले पण अपघात झाला. दीपक साठे अनुभवी पायलट होते. त्यांना एअरफोर्स ॲकेडमीचा प्रतिष्ठित ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ सन्मान आणि ‘राष्ट्रपती पदका’ने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलेदेखील आहेत. शनिवारी त्यांच्या आईचा जन्मदिवस होता. पण दुर्दैवाने कॅप्टन दीपक यांच्या निधनाची बातमी त्याच दिवशी आली. टेबलटॉपसारखी रचना असलेल्या एअरपोर्टवर लँडिंग करतेवेळी अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची विनंती त्यांची आई तसेच नातेवाईकांनी यावेळी केली.

Similar News