समीर वानखेडेंच्या याचिकेसाठी कोर्ट कर्मचाऱ्यांची घाई का? हायकोर्टाने फटकारले

Update: 2022-02-22 07:27 GMT

आर्यन खानवर ड्रग्ज प्रकरणी केलेली कारवाई, बनावट दाखल्यांद्वारे सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप, यामुळे समीर वानखेडे आधीच अडचणीत आले आहेत. त्यात आता बारसाठी लायसन्स मिळवण्याकरीता बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप समीर वानखेडेंवर करण्यात आला आहे. त्याबाबत त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पण ठाणे पोलिसांनी दाखल केलेला हा गुन्हा रद्द करावा, तसेच बारचे रद्द केलेले लायसन्स पूर्ववत करावे या मागण्यांसाठी समीर वानखेडे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

त्यावरील सुनावणी हायकोर्टात झाली. पण यावेळी हायकोर्टाने यावेळी समीर वानखेडे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. एवढेच नाही तर सुनावणी दरम्यान हायकोर्टाने आपला कार्यालयीन स्टाफ आणि वकिलांना चांगलेच फटकारले. समीर वानखेडे यांनी सोमवारी संध्याकाळी आपल्या याचिका हायकोर्टामध्ये दाखल केल्या, पण लगेचच त्या मंगळवारी सकाळी सुनावणीसाठी आल्याने न्यायमूर्तींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. बारचे लायसन्स पूर्ववत करावे यासाठी समीर वानखेडे यांनी याचिका केली आहे. त्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्या. गौतम पटेल यांनी आपल्या स्टाफला चांगलेच फटाकरे, याचिका दाखल झाल्यास ३ दिवसांनंतरची तारीख द्यायची असते, पण वानखेडे यांची याचिका एवढ्या तातडीने सुनावणीला का आली, या शब्दात कोर्टाने फटकारले.

सामान्य याचिकाकर्त्यांना नियमानुसार योग्य पद्धतीने सुनावणी मिळते, पण कुणी प्रभावशाली माणूस असला त्याच्या याचिकेवर तातडीने होणार, असे का होते आहे, ही न्यायव्यवस्था केवळ एवढ्याचसाठी आहे का, या शब्दात न्यायमूर्ती पटेल यांनी समीर वानखेडे यांचे वकील आणि आपल्या कर्मचाऱ्यांना सुनावले. बारच्या लायसन्ससाठीच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेतली जावी असा आग्रह का, लगेच सुनावणी झाली नाही तर आकाश कोसळणार नाही, असे सांगत कोर्टाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत.

Tags:    

Similar News