अहमदनगरमध्ये विजेच्या कडकडाटासह तुफान पावसाची हजेरी

Update: 2021-10-09 13:25 GMT

अहमदनगरमध्ये दुपारी तीन वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह तुफान पावसाने(Heavy rain) हजेरी लावली आहे. नगर शहरासह पाथर्डी,नगर, राहुरी, नेवासा तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार पावसामुळे वाहने, बाजारपेठा पाण्याखाली बुडाल्या आहेत.

अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीतील आनंदी बाजार परिसरात पावसाच्या पाण्यात दुचाकी-चारचाकी वाहने बुडाली आहे, तर तीन वाजता पावसाला सुरुवात झाल्यानंतर अर्ध्या तासात धुवाधार पावसाने नगर शहरात पाणीच पाणी झाले.अद्यापही काही भागात जोरदार तर काही भागात कमी प्रमाणात पाऊस सुरू आहे. दरम्यान शहरातील सावेडी, केडगाव, उपनगरांत सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने महापालिकेकडून गटारी साफ केल्याचा दावा या पावसाने धुवून काढला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून अनेक रस्त्यांना नाल्याचे रूप प्राप्त झाले आहे.

अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यात वाहने बंद पडल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली होती तर, अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात दुचाकी घातल्याने दुचाकी चालक पाण्यात घसरून पडल्याच्या घटना समोर आल्या. पाण्यातून वाहने काढताना अनेकांना कसरत करावी लागली.



 

तर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहेत. तर कांदा आणि कपाशी पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Tags:    

Similar News