रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

Update: 2021-07-19 10:43 GMT

रायगड - संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अतिवृष्टी सुरू झाली आहे. संपूर्ण कोकणातही पावसाचा जोर वाढला आहे. दोन दिवसांपासून रायगड जिल्हयात पावसाने जोर धरला आहे. बहुतांशी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अगोदरच नदीकाठीवरील गावांना सतर्क केले होते, त्यामुळे जीवितहानी झालेली नाही.

रायगड जिल्ह्यातील रोहा कुंडलिका, नागोठणे येथील अंबा तर रसायनी येथील पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या भागात काही प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नागोठणे एसटी आगारात पाणी घुसले आहे. परिसरातील रस्तेही जलमय होऊन गेले आहेत.

सखल भागातील नागरिकांना विशेषतः नदी, खाडी आणि समुद्र किनाऱ्यावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरड कोसळण्याची भीती असलेल्या गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी. अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच प्रवास करावा. तसेच आपत्कालीन प्रसंगी जवळच्या तहसील कार्यालय किंवा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे कऱण्यात आले आहे.

Tags:    

Similar News