गरज सरो वैद्य मरो... : कोविड काळातील कंत्राटी आरोग्यसेवकांची वेतनाअभावी परवड

कोरोनाच्या संकटात आरोग्यदुत, कोविडयोध्दे म्हणवले गेलेले राज्यभरातील कंत्राटी आरोग्यसेवकांची अवस्था `गरज सरो वैद्य मरो` अशी झाली आहे. गेल्या पाच महीन्यापासून राज्यभरातील आरोग्यसेवकांची वेतनाअभावी परवड सुरु आहे.

Update: 2021-09-16 04:05 GMT

साथरोग आटोक्यात आणण्यासाठी कोरोना काळात राज्याची वैद्यकीय यंत्रणा अपुरी असल्याचे उघड झाले होते. राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि जिल्हा एकात्मिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत ऑनलाईन जाहीरात मागणून जी.एन.एम, ए.एम.एम, डाटा एन्ट्री ऑपरेटर, फार्मसीस्ट, डॉक्टर,सफाई कामगार, विविध टेक्निशियन, भांडारपाल, वार्डबॉय आयदी पदांची हजारोच्या संख्येने नोकरभरती केली होती. या सर्वांना त्या कठीण काळात कोरोना योध्दा म्हणुन सन्मानित केले होते.

करोना संकटकाळात झटणाऱ्या कंत्राटी आरोग्यसेवकांना राज्यभर गेल्या पाच महिन्यांपासून वेतनच दिले नाही. याबाबत कंत्राटदार आरोग्य विभागाकडे बोट दाखवत आहे तर आरोग्य विभाग निधीचे कारण पुढे करीत आहे. मात्र करोनाकाळात जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या आरोग्यसेवकांना तुटपुंजे मिळणारे वेतनही हाती न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

आंबजोगाई जिल्हा बीड येथील आरोग्यसेवक गणेश उदारे यांनी याबाबत मॅक्स महाराष्ट्रला माहीती देताना आरोग्यसेवकांची परवड सुरु असल्याचे सांगितले. वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा करुन निधी नसल्याचे कारण देत वेतनाला विलंब करत असल्याचे ते म्हणाले.

आरोग्यसेवकांच्या वेतनासाठी सचिवालयातून निधी मंजूर होऊन तो पुणे येथील आरोग्य विभागाकडे वर्ग केला जातो. त्यानंतर पुन्हा अर्थ विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर तो आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे पाठविलो जातो. असा प्रत्येक महिन्याचा या वेतननिधीचा प्रवास मात्र करोना काळात अडकला आहे. या कंत्राटी आरोग्यसेवकांचे वेतन गेल्या पाच महिन्यांपासून होऊ  शकलेले नाही. शासनस्तरावर निधी पुणे येथील आरोग्य विभागाकडे येतो. त्यानंतर पुणे कार्यालयाकडून तो संबधित कार्यालयात आल्यावर आम्ही तो वितरित करतो. गेल्या पाच महिन्यांपासून तो निधी आलेला नसल्याने आमचा पाठपुरावा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा प्रश्न मांडण्यात आला आहे. तसा पत्रव्यवहार करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्याचं म्हणनं आहे.

एकंदरीत गरज सरो वैद्य मरो अशी अवस्था कंत्राटी आरोग्यसेवकांची झाली आहे. कोरोना तिसऱ्या लाटेचं संकट डोक्यावर असताना आरोग्यसेवकांची अशी परवडणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

Tags:    

Similar News