राज्यपाल एका मंत्री महोदयांवर नाराज, मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

Update: 2020-05-23 01:22 GMT

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या एका कृतीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. कोरोनामुळे रखडलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करणारे पत्र सामंत यांनी युजीसीला पाठवले होते. पण सामंत यांच्या या पत्रावर आक्षेप घेत राज्यपालांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्र्यांना कळवली आहे. “अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करणं म्हणजे युजीसीच्या गाईडलाइन्सचं उल्लंघन आहे. युजीसीला असे पत्र लिहिण्या अगोदर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी राज्यापालांना माहिती दिली नाही,” या शब्दात राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देणे योग्य ठरणार नाही अशी भूमिका राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मांडली आहे.

त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा लवकरात लवकर घ्याव्या असे आदेशही दिले आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलेला अनावश्यक हस्तक्षेप आणि यूजीसीची मार्गदर्शक तत्व आणि महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना समज द्यावी अशी सूचनाही राज्यपालांनी केली आहे.

दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. “राज्यपालांचा गैरसमज झालाय, मी युजीसीला पत्र लिहून माझं मत मांडलं. राज्यातील कोव्हीडची सद्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. हे विद्यार्थ्यांच्या मनातील पत्र आहे, आरोग्याचा प्रश्न लक्षात घेवून पत्र लिहीलं होतं, याबाबत मी राज्यपालांशी चर्चा करेन”.

Full View

Similar News