मंत्रीमंडळात नुकत्याच झालेल्या बैककीत एक निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये राज्यातील पोलीस पाटलांच्या मासिक वेतनात वाढ करण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी यासाठी भक्कम पाठपुरावा केला असून त्यानुसार राज्य मंत्रीमंडळाने हा मानधन वाढीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पोलीस पाटलांना दिलं जाणारं वेतन ६ हजार ५०० एवढं होतं. या निर्णयानंतर त्यात वाढ करून हे मानधन आता १५ हजार रूपये प्रतिमाह इतकं करण्यात आलेलं आहे.
माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्याकडून मानधनवाढीचे वचन
वाढती महागाई आणि गरजा लक्षात घेऊन गोंदियातील महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाने यासाठई लढा सुरू केला होता.राज्यभर सुरू असलेल्या या लढ्याची दखल घेत माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यासंदर्भात प्रशासनाबरोबर चर्चा करणार असल्याची ग्वाही पोलीस पाटलांना दिली होती. त्यानुसार सरकारी पातळीवर निर्णय झाल्याने आता आनंद व्यक्त करण्यात येत आहे. अलीकडेच गोंदियामध्ये पोलीस पाटलांची जिल्हास्तरीय कार्यशाळा, मेळावा व ज्येष्ठ सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी पोलीस पाटलांना मानधनवाढीचे वचन दिले होते.
पोलीस पाटील भवनाच्या उभारणीसाठी व गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या संघटनेला डॉ. परिणय फूके यांनी २५ लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेत पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करून घेऊ असं सांगितले होते. कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच डॉ. फुके यांनी गोंदिया ते लखनी हा प्रवास करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करुन चर्चा केली. पोलीसांच्या समस्यांविषयी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधत पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी केली.
देवेंद्र फडणवीसांनी दिली मानधनवाढीची ग्वाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. परिणय फुके यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मानधन वाढीची ग्वाही दिली होती. पोलिस पाटलांचे मानधन 6 हजार 500 रुपयांवरून 15 हजार रुपये करण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार बुधवार, (ता. १३ मार्च) रोजी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिस पाटलांच्या बैठकीत मानधनात 8 हजार 500 रुपयांनी वाढ करण्यात आली. आता पोलिस पाटलांना 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.