औंढानागनाथ मंदिर परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट ; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Update: 2021-11-09 02:56 GMT

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील औंढा शहरात व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. एका चहाच्या टपरीला आग लागून त्यात असलेले गॅस सिलिंडर फुटल्याने हा स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. धक्कादायक म्हणजे देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या औंढानागनाथ मंदिराच्या परिसरातील भक्त निवास क्रमांक दोन जवळ हा भीषण स्फोट झाला आहे.

सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही, घटना घडली त्यावेळी या ठिकाणी कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. या स्फोटाच्या आवाजाची तीव्रता एवढी होती की परिसरातील एक किलोमीटर पर्यंत आवाज ऐकायला गेला. त्यामुळे अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

या घटेनेमुळे औंढा नागनाथ मंदिर व्यवस्थापन व पोलिसांचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील अनेक महिन्यांपासून मंदिर परिसरात अनधिकृत व्यावसायिक आपली दुकाने थाटून बसली आहेत. त्याच बरोबर मंदिर परिसरात अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद आहेत. दरम्यान या घटने प्रकरणी औंढा पोलिसांनी नोंद केली असून अधिक तपास करत आहे.

Tags:    

Similar News