वाळू माफियांच्या हल्ला प्रकरणी चार जणांना अटक; पोलीस कोठडीत रवानगी

Update: 2024-03-04 06:51 GMT

जालना/अजय गाढे : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर वाळू माफियांनी केलेल्या हल्ला प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांची चार दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सदर प्रकरणी एक स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार व त्यांचे पथक बुधवारी रात्री भादली शिवारातील गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेले होते. या पथकाने तीन हायवा, तीन ट्रॅक्टरसह एक जेसीबी पकडला. ही वाहने घनसावंगी पोलिस ठाण्याकडे नेताना रात्रीच्या वेळी हायवा वाळू माफियांनी पथकावर दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात पथकाच्या वाहनाचे नुकसान झाले होते.तर काही कर्मचाऱ्यांना मार लागला.या प्रकरणात आरोपींविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तपास करून चार जणांना अटक केली आहे. या आरोपींची चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करीत असून जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Tags:    

Similar News