प.बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला

Update: 2022-01-26 08:27 GMT

एकीकडे देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. तर दुसरीकडे पद्म पुरस्कारांच्या बाबतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये प.बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्यजी यांचेही नाव होते. त्यांना पद्भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पण याबाबत आपल्याला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, अशी भूमिका घेत बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पुरस्कार नाकारला आहे.

"आपल्याला याबद्दल कोणतीही माहिती नाही, पण जर सरकारने मला पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला असेल तर आपण तो फेटाळत आहोत" असे निवेदन त्यांनी दिले आहे. त्यांनी आपल्या सीपीएम पक्षाच्या सोशल मीडिया पेजवर दोन ओळींचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. पण केंद्र सरकारने बुद्धदेव भट्टाचार्यजी यांचे म्हणणे फेटाळले आहे. बुद्धदेव भट्टाचार्यजी यांच्या पत्नीशी आज सकाळीच केंद्रीय गृहसचिवांचे बोलणे झाले होते आणि त्यांनी पुरस्कार स्वीकारल्याचे सांगितले होते, असे स्पष्टीकरण सरकारने दिल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. बुद्धदेव भट्टाचार्यजी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक टीकाकारांपैकी एक आहेत. ७७ वर्षांचे भट्टाचार्यजी यांना वयोमानामुळे प्रकृतीचा त्रास असल्याने त्यांचा सार्वजनिक कार्यक्रमांमधला सहभागी फार कमी झाला आहे.

पद्म पुरस्कार नाकारण्याची घटना तशी दुर्मिळ आहे. पण ज्या व्यक्तीला पद्म पुरस्कार दिला जाणार असतो, त्यांना त्याबाबत माहिती दिल्यानंतरच नाव जाहीर केले जाते, असा नियम आहे. त्यामुळे भट्टाचार्यजी यांच्या कुटुंबाशी आज सकाळी संपर्क साधला गेला असेल तर तो नाव जाहीर केले गेल्यानंतर झाला का असाही प्रश्न निर्माण होतो आहे.

Tags:    

Similar News