BIG NEWS – देशात प्लाझ्मा थेरपीनं बरा झाला पहिला रुग्ण !

Update: 2020-04-27 01:00 GMT

दिल्लीतील मॅक्स साकेत या हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण प्लाझ्मा थेरपीनंतर पूर्णपणे बरा झाला असून त्याला रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण पुढचे २ आठवडे या रुग्णाला सरकारी नियमांप्रमाणे घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे. ४९ वर्षांच्या या रुग्णाला ४ एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाल्यानं हॉस्पिटलमध्ये एडमिट करावे लागले होते.

त्यानंतर या पेशंटला निमोनिया झाला आणि त्यांची प्रकृती खालावत जाऊन ८ एप्रिल रोजी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण तरीही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर या पेशंटच्या नातेवाईकांना हॉस्पिटल प्रशासनाला प्लाझ्मा थेरपीची विनंती केली आणि १४ एप्रिलच्या रात्री या रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली.

प्लाझ्मा थेरपीमध्ये विशिष्ट रोगातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा त्याच आजाराच्या इतर रुग्णांच्या शरीरात वापरला जातो. प्लाझ्मामध्ये आपल्या रक्तपेशी असतात. त्या शरीरावर होणाऱ्या बाह्य़ आक्रमणापासून वाचवतात. या रुग्णावर उपचार करण्यासाठी कोरोनामधून बऱ्या झालेल्या एका प्लाझ्मा दात्याचा शोध घेण्यात आला. या रुग्णाच्या आधी २ चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या.

तसंच प्लाझ्मा देण्याच्याआधीही पुन्हा एकदा चाचणी करण्यात आली, ती चाचणीसुदद्धा निगेटीव्ह आली. त्यानंतर या दात्याच्या शरिरातून ४०० मिलिलीटर प्लाझ्मा घेण्यात आला. यामध्ये २ रुग्णांवर उपचार होऊ शकतात. एक दाता ४०० मिलिलीटर प्लाझ्मा देऊ शकतो. या रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आल्यानंतर काही तासातच त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि अखेर १८ एप्रिलला या रुग्णाचे व्हेंटिलेटर काढून त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आणि पूर्ण बरे झाल्यानंतर रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

Similar News