ग्रेटा टूलकिट प्रकरणी निकिता जेकब यांना जामीन मंजूर

पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी धरपकड सुरु केल्यानंतर संशयित अ‍ॅड. निकिता जेकब यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयाने तीन आठवड्यांसाठी निकिता यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

Update: 2021-02-17 08:17 GMT

गेले अनेक दिवस राजधानी दिल्लीच्या सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. आंतराष्ट्रीय पातळीवर या आंदोलनाची दखल घेतल्यानंतर केंद्र सरकार हादरले होते. भारतातील खेळाडू आणि सेलेब्रीटींनी ट्वीट करुन आमच्या अंतर्गत प्रश्नात लक्ष घालू नये असे म्हटले होते. एकसमान ट्विट झाल्यानंतर सेलेब्रिटी आणि खेळाडूंवर टीका झाली होती. त्यानंतर टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बंगळुरूतील दिशा रवी या पर्यावरणवादी कार्यकर्तीला रविवारी अटक केली होती. अ‍ॅड. निकिता जेकब आणि बीड येथील शंतनू मुळूक यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर दिल्ली पोलीस अटकेचे प्रयत्न सुरू केले होते. अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्यानंतर निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

शंतनू यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठात याचिका दाखल केली होती. तर निकिता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शंतनू यांना काल औरंगाबाद खंठपीठाने अंतरिम जामीन दिला होता. तर निकिता यांच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयाने निकिता जेकब यांना तीन आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला. त्याचबरोबर या दरम्यान त्यांना अटक झालीच, तर २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात यावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती पी.डी. नाईक यांनी याचिकेवर निर्णय दिल्यामुळे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Tags:    

Similar News