डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कोणत्याही हल्ल्याने संपणार नाहीत: डॉ.संजय सोनावणे

Update: 2020-07-08 10:51 GMT

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तूची अज्ञातांकडून झालेली तोडफोड निषेधार्ह आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संपूर्ण देशाला प्रेरक व तारक असून हे विचार कोणत्याही हल्ल्याने संपणारे नाहीत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या व ग्रंथसंपदेचा ठेवा असलेल्या राजगृहाची तोडफोड ही बाब निंदनीय असून या वास्तुसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी राज्यसरकारने घ्यावी व या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष,ज्येष्ठ समाजसेवक डॉ.संजय सोनावणे यांनी केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि लोकशाहीच्या तत्वप्रणालीवर आधारलेली विज्ञाननिष्ठ राज्यघटना बहाल करून खंडप्राय असलेल्या देशाला कायम एकसंघ ठेवले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशावर अनंत उपकार आहेत. त्यामुळे प्रत्येक देशवासीयांनी कायम त्यांचे ऋणात राहिले पाहिजे.

मात्र, काही जातीयवादी धर्माध शक्ती त्यांचे अस्तित्व दाखवणाऱ्या वास्तूंवर हल्ले चढवीत आहेत. राजगृहावर झालेला हल्ला हा समस्त आंबेडकरी, बहुजन समाजाच्या अस्तित्वावर झालेला हल्ला असून याचा जाहीर निषेध करीत असल्याचे डॉ.सोनावणे म्हणाले.

आजघडीला देशात असुरक्षित असलेल्या व्यक्तींना पोलीस संरक्षण पुरविले जाते. मग डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्ताचे वारसदार असलेल्या बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना पोलीस संरक्षण का दिले जात नाही, असा सवाल डॉ.सोनावणे यांनी उपस्थित करत डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाला राज्य सरकारने पोलीस संरक्षण द्यावे. अशी मागणी डॉ.संजय सोनावणे यांनी केली आहे.

Full View

 

Similar News