वडेट्टीवारांचा अजून एक गोंधळ निस्तरा : डॉ. अभय बंग

राज्यातील अनलॉकच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सरकारमधला गोंधळ समोर आला. पण आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी थेट मुख्यमंत्र्यांना वडेट्टीवारांचा एक गोंधळ निस्तरण्याचे आवाहन केले आहे.

Update: 2021-06-05 11:20 GMT

राज्यातील अनलॉकबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या घाईनं सरकारमध्ये कसा विसंवाद सुरू आहे, याचा प्रत्यय आला. त्यातच आता विजय वडेट्टीवार यांच्यावर दारुबंदी उठवण्याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी टीका केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली आहे. डॉ. बंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आवाहन केले आहे.

"लॉकडाउन उठविण्याविषयी अधिकार-बाह्य घोषणा करून राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करणारे मंत्री श्री विजय वडेट्टीवार यांनी चार दिवस अगोदर अजून एक गोंधळ निर्माण केला आहे. चंद्रपूर पाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यातही दारूबंदी उठविण्यासाठी समिती नेमण्याची जाहीर सूचना २९ मे रोजी गडचिरोलीत करून त्यांनी दारूबंदी, आदिवासी व स्त्रियांचे हित आणि राज्यसरकारची भूमिका या विषयी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या मनात संशय व गोंधळ निर्माण केला आहे. श्री वडेट्टीवारांचा हा गोंधळ अजाणता घडलेला नाही. त्यांना चंद्रपूरला वार्षिक एक हजार कोटी रुपयांचा व गडचिरोलीत पाचशे कोटी रुपयांचा दारू व्यापार उभारायचा आहे. त्यासाठी हे केलेले सुतोवाच आहे.

गडचिरोली जिल्ह्यात १९९३ साली श्री. शरद पवार मुख्यमंत्री असतांना लागू केलेली दारूबंदी आहे. ती प्रभावी व लोकप्रिय आहे. येथील दारूबंदी ही केंद्र व राज्यशासनाच्या अधिकृत 'आदिवासी भागांसाठी दारुनीती' ला अनुसरून आहे. आणि विशेष म्हणजे स्वत: मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या 'दारू-तंबाखू नियंत्रण राज्यस्तरीय टास्क फोर्स' अंतर्गत गडचिरोलीत जिल्हाव्यापी दारू-तंबाखू नियंत्रणाचा प्रयोग सुरू आहे. त्यासाठी 'मुक्तीपथ' ही संघटना निर्माण करून जिल्ह्यातील ११०० गावांनी दारुमुक्ती संघटना स्थापन केल्या आहेत. महिलांनी आपआपल्या गावात २००० वेळा अहिंसक कृतीद्वारे बेकायदेशीर दारू बंद केली आहे. १०५० गाव व पाच तालुक्यातील आदिवासी ग्रामसभा महासंघ यांनी दारूबंदीच्या समर्थनाचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला पाठविले आहेत. जिल्हाधिकारी व पोलीस विभाग सक्रीयपणे जनतेतील या जागृतीला व अहिंसक अभियानाला समर्थन देत आहेत. जनता नक्षलवादाकडून लोकशाही मार्गाकडे वळते आहे. जिल्ह्यातली दारू ७० टक्के कमी झाली असून ४८,००० लोकांनी दारू पिणे बंद केले आहे. बेकायदेशीर दारू व तंबाखूवर होणार्याद खर्चात जवळपास वार्षिक शंभर कोटी रुपयांची कमी झाली आहे.

लोकसभा, विधानसभा व ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील बहुतेक उमेदवारांनी 'मी निवडून आलो किंवा न आलो, तरी दारूबंदीला समर्थन करीन व तिची प्रभावी अंमलबजावणी करीन' असे लिखित व व्हिडिओ रेकॉर्ड केलेले वचन मतदारांना दिलेले आहे. निवडून आलेले खासदार, सर्व आमदार असे वचनबध्द आहेत.

देशातला हा असा एकमेव व यशस्वी जिल्हाव्यापी प्रयोग आहे. २०१९ मधे त्याचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सहा मंत्री व सहा सचिव सदस्य असलेल्या राज्यशासनाच्या कार्यगटाने गडचिरोलीचा हा यशस्वी पॅटर्न इतर दोन जिल्ह्यात लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

आणि आता टास्कफोर्सचे अध्यक्ष मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री व उत्पादनशुल्क मंत्री श्री. अजितदादा पवार, व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना डावलून जेव्हा वडेट्टीवार राज्यसरकारच्या अधिकृत नीतीविरुध्द जाहीर सूचना करतात, तेव्हा या नक्षलवादग्रस्त जिल्ह्यात ते गोंधळ निर्माण करतात.

हा गोंधळ व मुंबई सरकारच्या हेतुविषयी लोकांच्या मनातला संशय दूर करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वस्त करावे असे आवाहन डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केले आहे.

Tags:    

Similar News