बाहेर पडण्यासाठी खोटे सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल होणार

Update: 2020-04-10 02:17 GMT

सध्या राज्यभरात कोरोनामुळे लॉकडाऊन आहे, तसंच जिल्ह्यांच्या सीमाही बंद कऱण्यात आल्या आहेत. पण काही गंभीर वैद्यकीय परिस्थिती असेल तर पोलिसांच्या परवानगीने नागरिकांना बाहेर जाता येते. परंतु आता पोलिसांनी दिलेल्या या सवलतीचा गैरफायदा घेतला जात असल्याचे बीड जिल्ह्यात उघड झाले आहे.

खोटे मेडिकल सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांची यापुढे गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील पिंपळा गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर , प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. या पिंपळा गाव परिसरात असणाऱ्या अकरा गावांना सील करण्यात आले आहे, तसंच या 11 गावांमध्ये जाण्यासाठी असणाऱ्या 12 मार्गांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या गावांमधील नागरिकांना बाहेर किंवा बाहेरील व्यक्तीला या गावात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाने या गावातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी 24 टीम बनवल्या आहेत. या 24 टीम प्रत्येक घरातील नागरिकांची तपासणी करत आहेत आणि जर कोणाला कोरोना सदृश्य लक्षणं आढळली तर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काही जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पोलीस पास मिळावा याकरीता डॉक्टरांकडून खोटे मेडिकल सर्टफिकेट दिले जात असल्याचे आणि काही अब्युलन्सचालकाही गैरप्रकार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी खोटं मेडिकल सर्टिफिकेट दिलं किंवा एखाद्या अब्युलन्सचालकाने चुकीचे काम केले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा बीड जिल्हायाचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला आहे.

Similar News