राज्यातील मंत्री आणि मुख्य सचिवांचा संघर्ष शिगेला, मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी

Update: 2020-06-11 01:31 GMT

राज्याचे मंत्रिमंडळ आणि मुख्य सचिव यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे अधिकाऱ्यांची तक्रार केली मंत्र्यांना विश्‍वासात न घेता प्रस्ताव मंजूर केले जात असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. भुजबळ यांच्या या आरोपांना इतर मंत्र्यांनी पाठिंबा दर्शवला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawa) यांनी तर प्रस्ताव रद्द करा अशा प्रकारची सूचना केली. या प्रकारामुळे मंत्र्यांचे आदेश अधिकारी पाळत नाहीत असं स्पष्ट झााले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि त्या विभागाचे सचिव यांच्याकडून वारंवार नवनवे आदेश काढले जातात. त्यामुळे मंत्रालय ते जिल्हा पातळीवर समन्वय साधल्यास कनिष्ठ अधिकार्‍यांची दमछाक होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी मात्र यासंदर्भात अशा प्रकारचा कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मुख्य सचिवांनी नीट माहिती न दिल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मुख्य सचिव अजॉय मेहता (ajoy mehta)हे मनमानी कारभार करतात आणि इतर अधिकाऱ्यांना कस्पटासमान मानत असल्याचं काही अधिकारी खासगीत सांगतात.

मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi)यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रवीण परदेशी आणि अजॉय मेहता यांच्या समन्वय नव्हता. इतकंच नाही तर त्यांच्यामध्ये अनेकवेळा वादही झाला होता आणि त्याचा परिणाम महानगरपालिकेच्या नियोजनात झाला असा आरोप अनेक आमदारांकडून करण्यात येत आहे. मुख्य सचिवपदाची कारकीर्द संपली असतानाही अजॉय मेहता यांना राज्य सरकारने वाढीव मुदत दिली आहे.

अजॉय मेहता यांचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चांगले संबंध असल्याची चर्चा आहे आणि इतकेच नाही तर दिल्लीश्वरांशीही मेहता यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम करू नये असा मेहता यांचा प्रयत्न असल्याची अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे.

छगन भुजबळ, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan)आणि मंत्रिमंडळातील अनेक जेष्ठ मंत्री यांच्या सूचनांनाही मुख्य सचिवांकडून केराची टोपलीत दाखवली जाते, अशी माहिती सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. हा सर्व प्रप्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी राज्यपाल आणि मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्या जवळकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. राज्यपाल हे थेट अधिकाऱ्यांना आदेश देतात असं शरद पवार यांनी मोदींना सांगत हा प्रकार परंपरेला धरून नाही आणि त्याचा गंभीर परिणाम राज्याच्या व्यवस्थापनावर होत असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणून दिलं होते. एकूणच मुख्य सचिवांच्या मनमानी कारभारामुळे वरिष्ठ अधिकारीच नाही तर मंत्रीही जेरीस आले आहेत. लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री योग्य ती भूमिका घेतील अशी चर्चा ज्येष्ठ मंत्री मंत्र्यांमध्ये सुरू आहे

Similar News