सर्वपक्षीय बैठक: आमच्याकडून राजकारण होणार नाही- देवेंद्र फडणवीस

Update: 2020-05-07 13:53 GMT

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यभरातील नेते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा मिटींगमध्ये सहभागी झाले होते. तर मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सरकारच्या वतीनं मिटींगला हजर होते. तर विरोधी पक्षातून भाजप च्या वतीनं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, मनसे प्रमुख राज ठाकरे, शेकापच्या वतीनं आमदार जयंत पाटीलही मंत्रालयातून या बैठकीत सहभागी झाले होते.

या बैठकीला उपस्थित असलेल्या विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून काही सूचना केल्या. मुंबई आणि राज्यातील आरोग्य परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज असून रुग्णालय व्यवस्थापन ठीक करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. गंभीर रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे. तसेच आजारी पडणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी नियोजन करावे लागेल.

कोव्हीड नसलेल्या रुग्णांना उपचार मिळणे, रुग्णांना बेड्सची व इतर माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळावी. रुग्णांचे इतर संपर्क मोठ्या प्रमाणावर शोधले पाहिजे तसेच प्रशासनात समन्वय हवा तो घडवून आणणे महत्वाचे आहे असे सांगितले. परराज्यातील २०-२५ हजार श्रमिक पायी घरी निघाल्याचे चित्र आहे,केंद्राला अधिकाधिक रेल्वे मागितल्या पाहिजेत, पोलिसांचे नैतिक बळ वाढवावे, त्यांच्यातही कोरोना वाढतोय, त्यांना पुरेसे संरक्षण मिळावे. अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत केल्या.

तसंच आपली अर्थव्यवस्था सुरु करताना क्षेत्रनिहाय तज्ञांचे गट करावेत आणि गटनिहाय विविध उद्योग व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत. आमच्याकडून राजकारण होणार नाही. असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

 

Similar News