तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी द्या अन्यथा आंदोलन...

Update: 2019-09-09 17:06 GMT

शहरातील तृतीयपंथी(ट्रान्सजेंडर) यांच्यासाठी स्वतंत्र स्मशान भूमीची मागणी कमल फाउंडेशन व प्रहार जनशक्तीसह अनेक तृतीयपंथीयांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांची मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तृतीयपंथीयांनी दिला आहे.

नांदेड शहरात अनेक तृतीयपंथी वास्तव्यास असून त्यांना विविध योजनांपासून वंचित राहावे लागते. अशातच जीवन जगताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मृत्यूनंतरही त्यांचा वनवास काही संपत नाही. मृत्यू नंतरही त्यांना वाळीत टाकण्याचे काम समाजव्यवस्था प्रशासनाकडून होत आहे. तृतीयपंथी देखील समाजातील अविभाज्य घटक असल्याने त्यांना देखील इतरांप्रमाणे संविधानिक हक्क आहे. परंतु शासनाकडून त्यांच्यावर दुजाभाव केला जात असून अनेक दिवसांपासून तृतीयपंथीयांच्या स्मशान भूमीकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमी साठी मनपाकडे जागा उपलब्ध नाही..

तृतीयपंथीयांच्या स्वतंत्र स्मशान भूमीसाठी महानगर पालिकेकडे मागणी केली असता महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापकाकडून सद्यस्थितीत महानगर पालिकेकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे स्वतंत्र स्मशान भूमी देऊ शकत नसल्याचे पत्र कमल फाउंडेशनचे अध्यक्ष अमरदिप गोधने यांना महानगरपालिकेने दिले आहे.

Similar News