निर्भया बलात्कार प्रकरण; आरोपींच्या फाशीचा मार्ग मोकळा

Update: 2020-01-14 10:55 GMT

निर्भया बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या चारपैकी दोन आरोपींची क्युरेटिव याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिलाय. त्यामुळे आरोपींच्या फाशीतला मोठा अडथळा दूर झालाय. आरोपींनी यापुर्वी दाखल केलेल्या पुर्नविचार याचिका आणि क्युरेटिव याचिकेमध्ये काही बदल नाही, त्यामुळे याचिका फेटाळल्याचं न्यायालयानं म्हटलंय. गेल्या आठवड्यात चार आरोपींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी देण्याचा निर्णय न्यायालयानं दिला होता. चार आरोपींविरुध्द न्यायालयानं डेथ वॉरंटही जारी केलं होत.

आरोपींकडे कुठले पर्याय शिल्लक आहेत?

चारपैकी दोन आरोपी, विनय शर्मा, मुकेश सिंह आता राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज दाखल करु शकतात. मात्र राष्ट्रपतींकडून या आरोपींना दिलासा मिळण्याची शक्यता नाही.दया अर्जामध्ये केवळ फाशीची शिक्षेऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्याची विनंती करता येते. उर्वरीत दोन आरोपी अजूनही न्यायालयात क्युरेटिव याचिका आणि राष्ट्रपतीकडे दया अर्ज दाखल करु शकतात.

फाशी देण्याची तयारी पूर्ण

दरम्यान तिहार तुरुंगात या शिक्षेच्या अंमलबजावणीची तयारी सुरु आहे. गेल्या रविवारी जेल प्रशासनाने रंगीत तालीम म्हणून या आरोपींना डमी फाशी दिली. तिहारच्या जेल क्रमांक ३ मध्ये फाशी देण्यात येणार आहे.

दरम्यान तिहार तुरुंग प्रशासनानं फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची तयारी पूर्ण केलीये. या चौघांनाही फाशी देण्यासाठी २५ लाख रुपये खर्च करुन तुरुंगात नवं फाशी घर तयार करण्यात आलंय. चौघांनाही एकाचवेळी फाशी देणार असल्याचं तिहार प्रशासनानं यापूर्वीच स्पष्ट केलंय. न्यायालयाच्या निर्णयानंतर आरोपींना २२ जानेवारीला सकाळी सात वाजता फासावर लटकवलं जाणार आहे. अनेक वर्षांनंतर एकाच वेळी चार जणांना फाशी दिली जाणार आहे.

१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीत धावत्या बसमध्ये निर्भयावर सहा जणांनी अमानुष बलात्कार केला. गंभीर जखमी झालेल्या निर्भयाला उपचारासाठी सिंगापूर इथं हलवण्यात आलं होत. मात्र २६ डिसेंबरला उपचारादरम्यान निर्भयाचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली होती. या प्रकरणी पवन,अक्षय, विनय आणि मुकेश या चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली. खटल्याच्या दरम्यान मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात फाशी घेऊन आत्महत्या केली. तर अल्पवयीन असल्यामुळे दुसऱ्या एका आरोपीला ३ वर्षे बालसुधारगृहात ठेवण्यात आलं होतं.

Similar News