धक्कादायक : सायन हॉस्पिटलमध्ये मृतदेहांची अदलाबदल, २ कर्मचारी निलंबित

Update: 2020-09-14 11:01 GMT

कोरोना संकटाच्या काळात मुंबई महापालिकेचे सायन हॉस्पिटल भोंगळ कारभारामुळे वादात असते. पण महापालिका हॉस्पिटलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार रविवारी घडला आहे. या हॉस्पिटलमध्ये चक्क मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्याच मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना दिला गेला आणि त्यांनीही त्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. याप्रकरणी हॉस्पिटलने चूक मान्य करत २ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याप्रकरणी अंकुशच्या नातेवाईकांनी रुग्णालयाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हे ही वाचा

वडाळा इथे राहणाऱ्या अंकुश सुरवडे या २८ वर्षांच्या तरुणाचा शनिवारी रात्री अपघातात मृत्यू झाला होता. त्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण रविवारी 13 सप्टेंबर रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेमसाठी त्याचा मृतदेह नेण्यात आला. तिथे हेमंत नावाच्या व्यक्तीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले होते. पण हेमंतच्या नातेवाईकांना मृतदेह सोपवताना हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी अंकुशचा मृतदेह सोपवला. त्यांनी हॉस्पिटलजवळच्या स्मशानभूमीत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले.

पण ज्यावेळी अंकुशचे कुटुंबिय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले तेव्हा हा सगळा प्रकार उघड झाला. यावेळी हॉस्पिटलमध्ये मोठा गोंधळ देखील झाला. या प्रकरणी सायन पोलिसांनी जबाब नोंदविले असून पुढील कारवाई सुरु आहे. तर सायन रुग्णालयातील या घोळाबाबत दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने एक पत्रक काढून दिली आहे.

Similar News