यशोमती ठाकूर यांच्या 'मेळघाट पॅटर्न'ची देशभरात चर्चा, राहुल गांधींचं ट्वीट...

Update: 2021-06-12 15:58 GMT

देशात लसीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटात लसीकरणाची मोहिम यशस्वी केली आहे. याबाबत राहुल गांधी यांनी ट्वीट करत प्रशासनाचं कौतुक केलं आहे.

सध्या एकीकडे लस मिळत नाही तर दुसरीकडे लस असून आदिवासी लस घेण्यास नकार देत आहेत. असं असताना देखील अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चार गावांमध्ये १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. देशात या पॅटर्नला 'मेळघाट पॅटर्न' अशी ओळख मिळाली आहे.

राहुल गांधीचं ट्वीट

'मेळघाटमधील लसीकरण पॅटर्ननं स्थानिक भाषेचं महत्त्व पटवून दिलंय. अशा स्थानिक भाषांचं संवर्धन करण्याची गरज आहे,' तसंच, मेळघाटातील कोरकू भाषिकांचं १०० टक्के लसीकरण पूर्ण केल्याबद्दल स्थानिक प्रशासनाचं अभिनंदन.

असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं असून अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले असून 45 वर्षाच्या पुढील सर्वांचे लसीकरण झाल्याचं ट्वीटमधून सांगितलं आहे. तसंच कोरकू या स्थानिक भाषेमुळं हे झालं असल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


काय आहे कोरकू भाषा...

प्रशासनाने आदिवासींसाठी लस तर पाठवली. मात्र, या लसी संदर्भात आदिवासींचा गैरसमज निर्माण झाला होता. त्यामुळे आदिवासी समाज लस घ्यायला तयार नव्हता. त्यामुळे लसींचा मोठ्या प्रमाणात साठा झाला होता. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने डॉक्टरांच्या मदतीने कोरकू या स्थानिक भाषेचा वापर करत आदिवासींशी संवाद साधला. आज या गावांमध्ये स्थानिक भाषेच्या मदतीने 4 गावातील 45 वर्षांच्या पुढील सर्वांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

आदिवासींचं लसीकरण का गरजेचं आहे...?

मेळघाटात पुण्या मुंबईसारख्या आरोग्याच्या सुविधा नाहीत. त्यात आदिवासी लोक लसीकरण करण्यास तयार नव्हते. त्यामुळं आदिवासी बांधवांना कोरोनाची लागण होण्याची भीती होती. म्हणून या आदिवासींचं लसीकरण होणं गरजेचं होतं. एकंदरीत पाहता राजकीय इच्छाशक्तीचं पाठबळ आणि प्रशासनाने घेतलेले कष्ट यामुळे या 4 आदिवासी गावात लसीकरण पूर्ण झाल्याचं दिसून येतं.

Tags:    

Similar News