महाविकास आघाडीत खळबळ ; काँग्रेसने ४८ जागांवरील इच्छुकांची नावे मागवली

Update: 2024-01-05 05:16 GMT

महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या सूत्रावरून खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपावर अद्याप अस्पष्टता असताना काँग्रेसने राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची १० जानेवारीपर्यंत नावे मागवून मित्रपक्षांना बुचकळ्यात टाकले आहे. त्यामुळे काँग्रेस एकला चलोची भूमीका घेणारा का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

देशभरात आगामी लोकसभा निवडणूकीवरून इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीतील जागांची चाचपणी चालली आहे. आता पर्यंत कोणत्याही पक्षाने जागा निश्चित केलेल्या नाहीत. राज्यातील ४८ जागांचा तिन्ही राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सरचिटणीस, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे मुख्यमंत्री व विधिमंडळ नेत्यांची गुरुवारी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याच्या लोकसभा जागावाटपावरून महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात या बैठकीसाठी गेले होते. काँग्रेसने सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. समितीच्या माध्यमातून राज्याच्या जागा वाटपाची चर्चा सुरू होणार आहे. बैठकीत राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेच्या तयारीबाबतही चर्चा झाल्याचे समजते.

दिल्लीतील बैठक आटोपताच सर्व जिल्हाध्यक्षांकडून राज्यातील इच्छुकांची नावे १० जानेवारीपर्यंत पाठवण्याची सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्याकडे संघटन व प्रशासनाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी लगेच सायंकाळी सर्व जिल्हाध्यक्षांकडून नावे मागवली आहेत.

Tags:    

Similar News