महात्मा गांधींविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Update: 2019-09-16 13:22 GMT

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अश्लाघ्य भाषा वापरत फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मयूर जोशी नामक इसमावर सामाजिक भावना दुखावल्या प्रकरणी कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने कोथरूड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंड्स ग्रुप गांधी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कार्यरत असलेली संस्था असून फेसबुक या समाज माध्यमावर नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंड्स नावाचा ग्रुप आहे. या ग्रुप मध्ये गांधी विचारांचे ९ हजारांहून अधिक सदस्य जोडलेले आहेत. याच ग्रुप चे सदस्य आणि पर्यावरण तज्ञ डॉ विश्वंभर चौधरी यांनी अयशस्वी चांद्रयान मोहीम २ विषयी त्यांचे म्हणणे फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून मांडले होते.

तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे मयूर जोशी नामक फेसबुक अकाउंटवरून चौधरी यांच्या पोस्ट वर टिप्पणी करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची बदनामी करणे, त्यांच्याबद्दल जाणीवपूर्वक अपप्रचार करणे, तसेच त्यांच्या विषयी अश्लील शब्द वापरले आहेत. परिणामी विधायक कार्य करणाऱ्या नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंड्स ग्रुपच्या सदस्यांच्या सामाजिक व वैचारिक भावना दुखावल्या गेल्या. संस्थेचे सदस्य संकेत मुनोत यांनी सांगितल्याप्रमाणे मयूर जोशी यांच्या या असंविधानिक टिप्पणीमुळे गांधी विचारांना मानणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर भा. द. वि अंतर्गत फेसबुक या समाज माध्यमातून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे, व बदनामी केल्याबद्दल आय टी कायद्याच्या कलम ६६ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी तक्रार संस्थेच्या वतीने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती.

Similar News