मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणणार 1 लाख 40 हजार कोटी

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात 1 लाख 40 हजार कोटी आणणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Update: 2023-01-17 06:50 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दावोस (Davos) येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेला गेले आहेत. या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात 1 लाख 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणणार असल्याचा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. त्यापैकी 45 हजार 900 कोटी रुपयांचे करार करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, केंद्रीय उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या लॉजिस्टिक इझ अक्रॉस डिफरंट स्टेट्स अहवालानुसार महाराष्ट्राला अचिव्हर श्रेणीत स्थान मिळाले आहे. त्याबरोबरच आर्थिक वर्ष 2020-21 या वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक 39.1 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली होती. तसेच देशाच्या एकूण निर्यात मुल्यापैकी 20 टक्के निर्यात मुल्य महाराष्ट्राचे आहे. तसेच औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 15 टक्के आहे, असंही सरकारने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात 44 आर्थिक क्षेत्र ( special Industrial Zone)आहेत. याबरोबरच महाराष्ट्र निर्यात निर्देशांकात पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच निती आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात भारतातील पहिले ग्रीनफिल्ड स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून औरंगाबाद येथे ऑरिकची स्थापना करण्यात आली आहे. याबरोबरच राज्यात 5 आंतरराष्ट्रीय, 13 देशांतर्गत विमानतळ आहेत. तसेच 2 मोठी आणि 53 छोटी बंदरे आहेत. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ सर्वाधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशाचे औद्योगिक शक्तीकेंद्र म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे या सगळ्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून 1 लाख 40 हजार कोटींचे सामंजस्य करार करणार असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितेल्या 1 लाख 40 हजार कोटींपैकी पहिल्या दिवशी 45 हजार 900 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे करार करण्यात आल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News