'शेतीची चिंता करू नका, नुकसान भरपाई दिली जाईल' - मुख्यमंत्री

Update: 2019-08-08 14:00 GMT

तुमच्या शेतीची चिंता तुम्ही करू नका. जे काही नुकसान झाले असेल त्याची भरपाई दिली जाईल, असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिला. फडणवीस यांनी आज कोल्हापूर येथील शिवाजी पूल येथे भेट देऊन रेस्क्यू ऑपरेशन आणि पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय मंडलिक आदी उपस्थित होते.

यानंतर त्यांनी छत्रपती शाहू विद्यालय आणि कल्याणी हॉल येथे पूरग्रस्तांच्या शिबीराला भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. 'तुमचं जीवन महत्वाचं आहे. तुम्ही सुखरूपणे बाहेर आलात याच जास्त समाधान आहे. तुमच्या शेतीचं जे काही नुकसान झालं असेल त्याची नुकसान भरपाई दिली जाईल. त्याची चिंता करू नका. ती आमची जबाबदारी आहे', असं फडणवीस म्हणाले. पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना घरांची तसेच शेतीची नुकसान भरपाई दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना आरोग्याची सुविधा दिली जाईल, असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला.

Similar News