‘छपाक’ला ‘बनावट’ विरोध, अनेकांनी कॅन्सल केलं एकच तिकीट !

Update: 2020-01-09 07:18 GMT

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने जेएनयूमध्ये जाऊन तिथं झालेल्य हल्ल्याचा निषेध नोंदवला आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबाही दर्शवला. पण त्यानंतर दीपिका पदुकोणवर काही जणांकडून जोरदार टीका करण्यात येतेय. त्यात दीपिकानं तिच्या उद्या रिलीज होणाऱ्या छपाक सिनेमाच्या प्रमोशनसाठी हा स्टंट केल्याचा आरोपही काहींनी केला. तर अनेकांनी छपाकवर बहिष्कार टाका अशी भूमिका सोशल मीडियावर मांडली.

दीपिकाच्या विरोधकांनी छपाक सिनेमाचं बुक केलेलं तिकीट रद्द केल्याचे ट्विट केले. पण हे ट्विट करत असताना अनेकांनी केलेल्या ट्विटमध्ये एकाच नंबरचे तिकीट असल्याचे दिसतंय. त्यामुळे सोशल मीडियामधून आपल्याला समर्थन मिळावं यासाठी या महाभागांनी केलेल्या प्रयत्न फसल्याचं दिसतंय.

या लोकांनी एकाच व्यक्तीनं ट्विटरवर टाकलेले तिकीट पुन्हा पुन्हा रिट्विट करत आम्हीही तिकीट रद्द करत असल्याचं लिहिलंय. पण जेव्हा मॅक्स महाराष्ट्रनं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेखर चहल यांनी सर्वप्रथम हे तिकीट रद्द करत असल्याचा फोटो ट्विट केलं होतं. त्यानंतर इतरही काही लोकांनी असेच ट्विट केले. पण या सगळ्यांच्या ट्विटमध्ये तिकीटाचे आसनमक्रमांक A10.A8, A9 असे सारखेच दिसत आहेत. एकूणच एकाच व्यक्तीनं काढलेलं तिकीट रद्द केलं आणि त्याच तिकीटाचे फोटो रिव्टिट करत या लोकांनी दिपिकाविरोधात नाराजी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला.

जेएनयूमध्ये हॉस्टेलमध्ये रात्रीच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. त्यानंतर देशभरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. स्वरा भास्कर, तापसी पन्नू, अनुराग कश्यप, सोनम कपूर, शबाना आझमी, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी निषेध व्यक्त केला होता. पण बॉलिवूडमधले दिग्गज कलाकार यावर गप्प असल्याने सवाल उपस्थित केले जात आहेत. पण दीपिका पदुकोणने थेट जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली, ती तिथं काहीच बोलली नाही, पण दीपिकानं तिथं जाऊन हल्ल्याचा निषेध केल्यानं सर्वत्र तिचं कौतुकही झाले.

लक्ष्मी अग्रवाल या एसिड हल्ला पीडित महिलेच्या जीवनावर आधारित सिनेमात दीपिकाने त्या पीडित महिलेची भूमिका साकारलीये. त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिका जेएनयूमध्ये गेली, असा आरोप काहींनी करत तिच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. दीपिकाच्य समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन्ही ट्रेन्ड्स ट्विटरवर गेले दोन दिवस आघाडीवर आहेत. दीपिकानं तिच्या या कृतीवर अजूनपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण दीपिकाच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करताना काही जणांचा खोटेपणा मात्र उघड झालाय हे नक्की....

 

 

Similar News