नवनीत राणांसारख्या लोकप्रतिनिधींची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही- अॅड असिम सरोदे

Update: 2022-09-10 06:42 GMT

गेल्या काही काळापासुन खासदार नवनीत राणा या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहिल्या आहेत. मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण प्रकरणात तर त्यांना तुरुंगात काही दिवस राहावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा त्या चांगल्याच अडकण्याची चिन्ह आहेत. अमरावतीमध्ये पोलिस ठाण्यात त्यांनी घातलेल्या राड्यानंतर पोलिस कुटूंबिय रस्त्यावर उतरले होते. आता त्यांच्या विरोधात वकिलांनीही आवाज उठवला आहे. नवनीत राणांसारख्या लोक प्रतिनिधींची दादागिरी राज्यात चालू देणार नसल्याचं अॅड असिम सरोदे यांनी म्हटलं आहे.

नवनीत राणा किंवा त्यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही

खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील मुलीगी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग दिला होता. त्यांनी त्यानंतर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मोठा राडा घातला होता. यासगळ्यानंतर नवनीत राणांविरोधात पोलीस कर्मचाऱ्यांचे नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले होते. आता वकीलांची मोठी फळी सुध्दा नवनीत राणा यांच्या विरोधात उभी झाली आहे. अॅड असिम सरोदे आणि त्यांच्या टीम ने खासदार नवनीत राणांना सज्जड दमच भरला आहे. पोलिसांवर जर कोणी बेकायदेशीर दबाव आणणार असेल, तर आम्ही त्याच्या विरोधात उभे राहू. नवनीत राणा किंवा त्यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही, अशा कठोर शब्दात अॅड. असिम सरोदे यांनी नवनीत राणांना सुनावले आहे.

नेमकं प्रकरण काय?

मंगळवारी अमरावतीमध्ये एक १९ वर्षीय तरुणीचं अपहरण झाल्याचा दावा तिच्या पालकांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सोहेल शहा नावाच्या युवकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी खा. नवनीत राणा यांनी पोलिस ठाण्यात कॉल केला होता परंतू त्यांचा फोन कॉल पोलिसांनी रेकॉर्ड केल्याचा आरोप करत पोलिस ठाण्यात राडा घातला होता. शिवाय या प्रकरणात लव्ह जिहाद होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यानंतर संबंधीत मुलगी रेल्वेने प्रवास करत असताना सातारा पोलिसांना मिळाली होती. ती एकटीच ट्रेन ने प्रवास करत होती. त्या मुलीने माध्यमांशी बोलताना आपल्याला पुढे शिकायचं असून कोर्स करायचा होता परंतू तो करण्यासाठी घरच्यांची परवानगी नसल्याने घरातून पळून गेल्याचं तिने सांगितलं. दरम्यान संबंधित मुलीचा शोध घेण्यासाठी अमरावती पोलिसांनी सातारा आणि पुणे पोलिसांची मदत घेतली होती अशी माहिती अमरावती पोलिसांनी दिली आहे.

Tags:    

Similar News