Bhima Koregaon : आनंद तेलतुंबडे यांना अखेर जामीन मंजूर

Update: 2022-11-18 09:02 GMT

भीमा कोरेगाव प्रकरणी एनआयए ने अटक केलेले आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण जामीनासाठी काय युक्तीवाद करण्यात आला? जाणून घेण्यासाठी वाचा...

भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पूर्वी विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन नामंजूर केला होता. तळोजा मध्यवर्ती कारागृहात ते २०२० पासून अटकेत आहेत. बराच काळ चाललेल्या सुनावणीत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. गडकरी (AS Gadkari) आणि मिलिंद जाधव(Milind Jadhav) यांच्या बेंच त्यांना जामीन मंजूर केला आहे. एन. आय. ए. च्या वतीने त्यांना जामीन मिळू नये, यासाठी युक्तीवाद केला तर त्यावर तेलतुंबडे यांचे वकील अॅड. मिहीर देसाई यांनी जोरदार प्रतिवाद केला.

यापूर्वी विशेष कोर्टाने त्यांचा जामीन नामंजूर केला असल्याचा दाखल देत एन आय ए (NIA) चे वकील अॅड. संदेश पाटील (Adv. Sandesh patil) यांनी तेलतुंबडे यांनी प्रतिबंधित असलेल्या संघटनांचा अजेंडा राबविण्यासाठी अनेक परिषदांमध्ये सहभाग घेतल्याचा युक्तिवाद केला. यासोबतच तेलतुंबडे हे पोलीस चकमकीत मारल्या गेलेल्या मिलिंद तेलतुंबडे याच्या संपर्कात असल्याचा युक्तिवाद देखील केला.

या युक्तिवादावर तेलतुंबडे यांचे वकील अॅड. मिहीर देसाई (Adv. Mihir Desai) यांनी निदर्शनास आणून दिले की, आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) हे शिक्षणतज्ञ असल्याने अनेकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी आमंत्रित केले जात होते. त्यासाठी उपस्थित असणे हा गुन्हा होऊ शकत नाही.

यावर खंडपीठाने म्हटले आहे कि तेलतुंबडे यांच्यावर कलम 38 आणि कलम ३९ अंतर्गत दहशतवादी संबंधित संघटनेशी संबंधित गुन्हे आहेत. याची जास्तीत जास्त शिक्षा दहा वर्ष इतकी होऊ शकते. या अगोदरच दोन वर्षे तुरुंगात काढले आहेत. हे पाहता कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

याबरोबरच NIA ला सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करता यावे, यासाठी या निर्णयाला एका आठवड्याची स्थगिती दिली आहे.

Tags:    

Similar News