कोरोना नियम धाब्यावर बसवत लग्न सोहळा, अधिकाऱ्यांची धडक कारवाई

Update: 2021-04-30 14:50 GMT

राज्यात कोरोनामुळे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लग्न सोहळा, साखरपुडा, अंत्यविधीसारख्या गोष्टींकरीता व्यक्तींची मर्यादा घालून देण्यात आली आहे. पण अजूनही लोक ते गांभिर्याने घेत नसल्याचे दिसते आहे. असाच प्रकार मुंबईतही समोर आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 'डी' विभागात बाबुलनाथ मंदिराजवळ संस्कृती हॉलमध्ये कोविड प्रतिबंध नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा आयोजित केला गेला. याप्रकरणी संबंधित सभागृहावर ५० हजार दंड आकारण्यात आला आहे. तसेच सभागृहात लग्न सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संबंधितांवर एफ. आय. आर. दाखल करण्याची प्रक्रिया गावदेवी पोलिसांना सुरू केली आहे, अशी माहिती 'डी' विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

नेमके झाले काय?

बाबुलनाथ मंदिराजवळील दादीसेठ मार्गालगत असणाऱ्या 'संस्कृती हॉल' मध्ये नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या विभाग कार्यालयाला मिळाली. यानंतर अधिकाऱ्यांच्या पथकाने याठिकाणी धाड टाकली. त्यावेळी तिथे विवाह कार्यक्रम सुरू असल्याचे व सुमारे १५० व्यक्ती विवाह सोहळ्याला उपस्थित असल्याचे आढळून आले. तसेच त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सही पाळले जात नसल्याचे दिसले.

या प्रकरणी त्या हॉल व्यवस्थापनावर आणि विवाह सोहळ्याच्या आयोजकांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. हॉल चालकांना ५० रुपये हजार दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच हॉलचालक आणि संबंधित लग्न सोहळ्याचे आयोजक यांच्याविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात एफ.आय.आर. दाखल केली जाणार आहे.

Tags:    

Similar News