भाजपच्या नवनिर्वाचित आमदारावर गुन्हा

Update: 2020-05-22 01:28 GMT

राज्यात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचं आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे. पण आता लोकप्रतिनिधीच या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील गोपीनाथ गड इथं भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार रमेश कराड यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.

पण यावेळी त्यांनी जमावबंदीचा आदेश झुगारून, जमाव एकत्र करून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी रमेश कराड यांच्यासह 22 जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रमेश कराड यांनी गोपीनाथ गड इथं येतांना, पोलीस प्रशासनाला कसलीही पूर्व कल्पना न देता , अचानकपणे दर्शनास येऊन लोक जमा केले. यावेळी त्यांच्या सोबत भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनी कराड यांच्यासह अनेक जण होते.

यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचे आणि प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाले आहे, असे त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आमदार कराड यांच्यासह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ.शालिनी कराड आणि इतरांवर कलम 143, 188, 269, 270, 271, भादवीसह कलम 51 (ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान संचारबंदीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यात आतापर्यंत भाजपच्या 2 आमदारांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

Similar News