अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपचं षडयंत्र, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Update: 2021-03-10 14:49 GMT

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे. पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही. तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानीच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी. यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच त्यांची वैयक्तीक सुरक्षा व्यवस्था असताना ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी? हा प्रश्न आहे.

२००९ साली अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घात पात करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात ज्याचे नाव समोर आले त्याचा मृत्यू दुस-याच दिवशी झाला होता, याची आठवणही पटोले यांनी करून दिली. राज्यात व देशात असलेल्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून भाजपानेच या मुद्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला असेही पटोले म्हणाले.

Tags:    

Similar News