भाजप-महाविकास आघाडी संघर्ष तीव्र, मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार
गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष रंगला आहे. मात्र आता हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. त्यातच मुंबईतील मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना न बोलवल्याने भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सामना रंगला आहे. त्यातच मुंबईतील मेट्रो 2 अ (दहिसर ते डी. एन. नगर) आणि मेट्रो 7 (दहिसर ते अंधेरी) या मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आज आरे मेट्रो स्थानक येथे होणार आहे. त्यासाठी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मेट्रो 2 आणि मेट्रो 7 च्या मार्गिकांचा उद्घाटन समारंभ आज दुपारी चार वाजता पार पडणार आहे. तर या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे. याबरोबरच या कार्यक्रमाचे भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण न देण्यात आल्याने भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
भाजपने या कार्यक्रमावरून महाविकास आघाडी श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका केली आहे. त्याबरोबरच भाजपने शहरात विविध ठिकाणी बॅनर लावून काम केलंय मुंबईकरांनी पाहिलंय, असं म्हटले आहे. तर या कार्यक्रमाला निमंत्रण नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी जरुर उद्घाटन करावं. पण जनतेला हे माहित आहे की, या दोन्ही मेट्रो प्रकल्पांचे काम मी सुरू केले होते. ते काम वेगाने पुढे गेले. मात्र आता ते काही कारणांमुळे अडकले आहे. त्यामुळे आम्हाला बोलवले नाही तरी मेट्रो 3 चा प्रश्न निकाली काढावा, असे फडणवीस यांनी म्हटले.
या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना न बोलवल्यामुळे नवा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.