२०१८-१९ या वर्षात भाजपला मिळाली ७०० कोटींहून अधिकची देणगी

Update: 2019-11-16 06:58 GMT

२०१८-१९ या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाला (BJP) ७०० कोटी रुपयांहून अधिकची देणगी मिळाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली. तब्बल २० हजार देणगीदारांनी भाजपला देणगी दिली आहे. राजकीय पक्षांना देणगीच्या रक्कमेची आणि देणगीदारांची नावं निवडणूक आयोगाला कळवणे सक्तीचे असते. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

भाजपला मिळालेल्या देणगीत सर्वाधिक ३५६ कोटी देणगी ही टाटा समूहाच्या ‘द प्रोगेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट’कडून मिळाली आहे. ‘प्रुडंट इलेक्ट्रोरल ट्रस्ट’ने भाजपला ६७ कोटी ३० लाखांची देणगी दिली आहे. या ट्रस्टला देणगी देणाऱ्यांमध्ये एअरटेल समूह, हीरो मोटोकॉर्प, ज्युबिलंट फूडवर्क्स, ओरिएंट सिमेंट, डीएलएफ, जेके टायर्स अशा कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय ‘आदित्य बिर्ला जनरल इलेक्टोरल ट्रस्ट’ने भाजपला २८ कोटी रु. दिले आहेत

भाजपला देणगीच्या स्वरूपात मिळणाऱ्या रकमेत दरवर्षी मोठी वाढ होताना दिसत आहे. २०१८-१९ मध्ये भाजपला विविध कंपन्यांकडून ४७० कोटी रु. देणगीच्या रुपात मिळाले होते तर २०१७-१८ मध्ये भाजपला १६७.८० कोटींची देणगी मिळाली होती.

दुसरीकडे २०१८-१९ या वर्षात काँग्रेसला(Congress) विविध निवडणूक ट्रस्टकडून केवळ ९० कोटी रूपये मिळाले आहेत. भाजपच्या मिळालेल्या देणगीच्या तुलनेत ही रक्कम फारच कमी आहे. भाजपला ३५६ कोटींची देणगी देणाऱ्या ‘द प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट’कडून काँग्रेसला फक्त ५५ कोटी रु. मिळाले आहेत. यासोबत प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून ३९ कोटी मिळाले आहेत तर ‘आदित्य बिर्ला जनरल इलेक्टोरल ट्रस्ट’ने काँग्रेसला २ कोटी रु. दिले आहेत.

Similar News