२१ डिसेंबर रोजी चलो दिल्लीचा नारा !

Update: 2020-12-18 15:00 GMT

दिल्ली इथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महाराष्ट्रातील हजारो शेतकरी सामील होणार आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली २१ डिसेंबर २०२० रोजी नाशिकमधून महाराष्ट्रातील हजारो शेतकरी दिल्लीच्या आंदोलनासाठी निघणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शेकडो वाहनांमधून हजारो शेतकरी १ हजार २६६ किलोमीटरचा प्रवास करून २४ डिसेंबर २०२० रोजी दिल्ली येथील बॉर्डरवर पोहोचतील. दिल्लीला विविध राज्यांना जोडणारे प्रमुख महामार्ग शेतकऱ्यांनी अगोदरच ब्लॉक केले आहेत.

महाराष्ट्रातील शेतकरी राजस्थान हरियाणा सीमेवर शहाजहानपूर येथे दिल्लीकडे जाणारा महामार्ग रोखत आंदोलनात सामील होतील. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान व दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आपले रेशन, पाणी, स्वयंपाक व निवासाची व्यवस्था सोबत घेऊन बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जाणार आहेत. किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावीत, राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, राज्य सहसचिव सुनील मालुसरे आणि सीटूचे राज्य अध्यक्ष व केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला.

महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमधील शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जमणार आहेत. मोदी सरकार कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदे आणत असल्याने ही लढाई केंद्र सरकार व त्यांचे कॉर्पोरेट भागीदार यांच्या विरोधात असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, शेतकरी विरोधी प्रस्तावित वीजबिल विधेयक मागे घ्यावे व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट आधार भावाचे संरक्षण मिळावे यासाठी केंद्रीय कायदा करावा अशी मागणी किसान सभेने केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या ऐतिहासिक चलो दिल्ली आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभा केले आहे.

Tags:    

Similar News