...तर ओडिशा रेल्वे दुर्घटना टाळता आली असती

ओडिशातील बालासोर इथल्या रेल्वे अपघातानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उत आलाय. मात्र, यात एक महत्त्वाची अपडेट हाती आलीय आणि ती म्हणजे ही रेल्वे ज्या मार्गावर धावत होती, त्याठिकाणच्या सुरक्षेत एक गंभीर त्रूटी राहून गेल्याचं आता समोर येत आहे. ही त्रूटी नसती कदाचित ही दुर्घटना टाळता आली असती, अशी चर्चा आता सुरू झालीय.

Update: 2023-06-03 10:39 GMT

ओडिशाच्या बालासोर इथली रेल्वे दुर्घटना ही मागील १५ वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना असल्याचं समोर येत आहे. या दुर्घटनेला अजून चोवीस तासही उलटलेले नाहीत मात्र, मृतांची संख्या वाढत चाललीय. दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६१ च्या वर पोहोचलाय. दुर्दैवानं ही संख्या वाढण्याची भीती वर्तवली जातेय. तर दुसरीकडे ६५० पेक्षा अधिक प्रवाशांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागानं दिलीय.

रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वेच्या तांत्रिक विभागानं ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP – Automatic Train Protection) अर्थात सुरक्षा कवच तयार केलेलं आहे. भारतातीलच तीन कंपन्यांनी एकत्रित केलेल्या संशोधनातून हे कवच तयार करण्यात आलंय.

रेल्वे कवच कसं काम करतं ?

समजा एखाद्या रेल्वेच्या चालकानं सिग्नल तोडला तर ही कवच यंत्रणा तात्काळ सक्रिय होते. त्यानंतर रेल्वेच्या चालकाला ही यंत्रणा सतर्क करते तर दुसरीकडे तात्काळ रेल्वेच्या ब्रेकवर नियंत्रण मिळवलं जातं. याशिवाय एकाच रेल्वे मार्गावर दुसरी रेल्वे धावत असेलव तर ही यंत्रणा पहिल्या रेल्वेची वाहतूक थांबवते. सुरक्षा कवच नावाची यंत्रणा सतत रेल्वेच्या हालचालींवर लक्ष ठेवून असते, त्यांचे सिग्नल्स संबंधितांना पाठवत असते. एकाच रेल्वेमार्गावर दोन रेल्वे आल्यानंतर एका ठराविक अंतरावर कवच च्या माध्यमातून दोन्ही रेल्वे थांबविल्या जातात. त्यानंतरही जर एखादी रेल्वे सिग्नल तोडून धावत असेल तर अशावेळी ५ किलोमीटर अंतरावरील सर्व रेल्वेच्या हालचाली आपोआप थांबतात. मात्र, ही सुरक्षा कवच नावाची यंत्रणा सर्वच रेल्वे मार्गांवर अजूनही उभारलेली नाही, त्यात ओडिशातील बालासोर रेल्वेमार्गाचाही समावेश असल्याची माहिती समोर आलीय. कदाचित ही यंत्रणा या मार्गावर असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी चर्चा आता सुरू झालीय.

Tags:    

Similar News