'ट्रान्स-टास्मन' संघ दुबईत भिडणार ; उत्सुकता शिगेला

Update: 2021-11-14 03:06 GMT

T-20 WC: ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड संघात आज ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. 'ट्रान्स-टास्मन' संघ दुबईत सत्ता प्रस्थापित करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील.

नामांकित खेळाडूंचा गाजावाजा न करता मूलभूत खेळाच्या बळावर भरारी घेणारा न्यूझीलंड आणि जागतिक स्तरावर नेहमीच बेधडक वृत्तीने निर्विवाद वर्चस्व गाजवणारा ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी कोण आज प्रथमच ट्वेन्टी-२० जेतेपदावर नाव कोरणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

कर्णधार केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या इंग्लंडला पराभवाचा धक्का देत प्रथमच अंतिम फेरीत मजल मारली, तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर सरशी साधून २०१० नंतर दुसऱ्यांदा महाअंतिम लढतीतील स्थान पक्के केले.

संघासाठी आतापर्यंत सर्वाधिक २३६ धावा करणारा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानविरुद्ध सामन्याला कलाटणी देणारा मॅथ्यू वेड यांना मोक्याच्या क्षणी सूर गवसल्याने न्यूझीलंडला सावध राहावे लागेल. मात्र , फिंच, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल या अनुभवी त्रिमूर्तीला अद्यापही चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसवर अतिरिक्त दडपण येत आहे.

Tags:    

Similar News