वृक्षतोड टाळण्याच्या अटीशर्तीवर, ठाकरे स्मृतीवनाला शासनाची मंजुरी

Update: 2020-03-10 03:49 GMT

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादमधील स्मृतीवन व स्मारकाचा आराखडा मंजूर करताना वृक्षतोड होणार नाही, याची पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दक्षता घेतली आहे. त्यानुसारच अंमलबजावणी करण्यात यावी, या ठळक अटीशर्तीसह महाविकास आघाडी सरकारने सदर स्मारकाच्या २५ कोटी ५० लाखांच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. सोमवारी, ९ मार्च रोजी त्याबाबतचा आदेश नगरविकास विभागाने जारी केला आहे.

मुंबईतील आरे जंगलातील वृक्षतोडीला शिवसेना नेते व विद्यमान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोध केल्यानंतर, औरंगाबाद मधील ठाकरे स्मृतीवनाबाबत शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. पण वृक्षतोडीला विरोधाची भूमिका शिवसेनेने ठाकरे स्मारकाबाबतही कायम ठेवली असल्याचं स्पष्ट झालं आहे. स्मारकासाठीची जागा सिडकोने महानगरपालिकेत हस्तांतरित केलेली आहे. ४ आॅक्टोबर २०१६ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सदरच्या ७ हेक्टर जागेत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीवन व स्मारकाची उभारणी करण्याचा निर्णय झालेला होता. तब्बल साडेतीन वर्षांनंतर सदर काम नव्याने मार्गी लागलं आहे.

सुरूवातीला १० कोटींच्या आसपास असलेलं काम महापालिकेने ६५ कोटींपर्यंत नेलं होतं. दरम्यानच्या काळात निविदा काढण्याचाही प्रयत्न औरंगाबाद महापालिकेने केला होता, पण ठेकेदारांकडूनच प्रतिसाद न मिळाल्याने तो फसला होता. आता नव्याने २५ कोटींच्या कामाला शासनाने मंजूरी दिलीय.

सदरच्या प्रकल्पाची अंमलबजावणी महानगरपालिकेकडेच देण्यात आली असून विहित कालावधीत व शासनाने घालून दिलेल्या अटीशर्तीनुसार स्मारकाची उभारणी करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर टाकण्यात आली आहे.

Similar News