‘त्या’ पारधी समाजातील बालकाच्या खुनाबाबत राज्य बाल आयोगाने मागितला अहवाल

Update: 2019-09-23 05:08 GMT

जमिनीच्या वादातून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पारधी समाजाच्या एका दोन वर्षाच्या मुलाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रने ‘अहमदनगर जिल्हा पुन्हा अॅट्रोसीटीने हादरला : पारधी समाजाच्या 2 वर्षाच्या मुलाची हत्या’ या मथळ्या खाली 8 सप्टेंबरला वृत्त दिले होते.

या संदर्भात हेरंबकुलकर्णी यांनी राज्य बाल आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानुसार राज्य बाल आयोगाने अहमदनगर पोलीस अधिक्षक यांना १५ दिवसात या तक्रारीबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हेरंब कुलकर्णी यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दल तक्रार केली होती.

पोलिसांनी आरोपी अटक केले परंतु पोलीस उपधीक्षक यांनी पत्रकारांना आरोपींचा जबाब घेतला व त्यांचा मारण्याचा हेतू नव्हता, वडिलांना मारताना मुलाला लागले असा तपशील पत्रकारांना सांगितला. मुळात आरोपी असंच बोलणार पण पोलिसांनी हे पत्रकारांना सांगण्याचे कारण काय? वास्तविक पहिल्या दिवसाच्या बातमीत 'यांची पुढची पिढी संपवून टाकू' असे बोलून मुलाला मारले असे लिहिलेले आहे. हीच जर तपासाची दिशा राहणार असेल तर तो खून न ठरता अपघात ठरून किरकोळ शिक्षा किंवा आरोपी निर्दोष ठरतील.

याबाबत राज्य बाल आयोगाकडे हेरंबकुलकर्णी यांनी पत्र लिहून लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यावर बाल आयोगाने ही कार्यवाही केली. पोलीस उपअधीक्षक यांनी आरोपींच्याबाबत असे सौम्य वाक्य का वापरले ? याबाबत त्यांना विचारणा करणे गरजेचं आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथे जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात दोन वर्षाच्या मुलाच्या डोक्यात सिमेंटचा खांब घालून त्याचा खून करण्यात आला होता. या हल्ल्यात वडिलांसह एक नातेवाईक गंभीर जखमी झाला आहे.

Similar News