CAA विरोधात नाटिका.. मुख्याध्यापिका आणि विद्यार्थिनीच्या आईला अटक

Update: 2020-01-31 11:54 GMT

CAA विरोधात नाटिका सादर केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी मुख्याध्यापिका आणि एका विद्यार्थिनीच्या आईला अटक केली आहे. यापूर्वी कर्नाटक पोलिसांनी CAA विरोधात नाटक बसवल्याप्रकरणी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याचा पराक्रम केला होता.

कर्नाटकातील बिदर इथल्या शाहीन शाळेत २० जानेवारी रोजी नागरिकत्व कायद्याविरोधात एक नाटिका सादर कऱण्यात आली होती. या नाटिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि इतर नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याची तक्कार एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे बिदर पोलिसांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि एका पालकाला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या फरीदा बेगम या शाहिन शाळेत मुख्याध्यापिका आहेत तर अनुजा मिंन्सा यांच्या मुलीने या नाटिकेत काम केलं होतं. या दोघांविरुध्द आम्हाला सबळ पुरावे मिळाले. या आधारावर आम्ही या दोघांना अटक केल्याचं बिदरचे एसपी श्रीधरा टी यांनी म्हटलंय.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये ही वादग्रस्त नाटिका सादर करण्यात मुख्याध्यापिकेनं महत्वाची भूमिका बजावली. यात पंतप्रधानांविषयी वादग्रस्त संवाद आहे हे माहिती असूनही मुख्याध्यापिकेनं नाटिकेच्या सादरीकरणाला मंजुरी दिली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

या नाटिकेत वादग्रस्त संवाद म्हणणाऱ्या विद्यार्थिनीच्या आईला आम्ही अटक केली आहे. नाटकात पंतप्रधानांना चपलेनं मारण्याविषयी एक संवाद आहे. यामध्ये सदर विद्यार्थिनी बोलतांना हातात चप्पल घेते असं दृश्य आहे आणि ही चप्पल उपलब्ध करुन देण्याचा ठपका पोलिसांनी या मिंन्सा यांच्यावर ठेवलाय.

दोन्ही महिला आरोपींना अटक करुन कोर्टात सादर करण्यात आलं. कोर्टानं दोघांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. दोघांवर देशद्रोह (आयपीसी कलम १२४ ए) आणि शांतता भंग करण्याचा (आयपीसी कलम ५०४) आरोप लावण्यात आलेत. दोघांचीही सखोल चौकशी सुरु असल्याचं पोलिस अधीक्षकांनी सांगितलंय.

निलेश रक्षाल नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. नागरिकत्व कायद्यासोबत एनआरसी कायदा लागू झाल्यास मुस्लिमांना देश सोडावा लागणार असल्याचा उल्लेख या नाटिकेत करण्यात आल्याचा आरोप त्याने केला होता.

या नाटिकेची व्हिडीओ क्लिप २१ जानेवारीला बिदरच्या एका पत्रकाराने फेसबूकवर टाकली होती. दुसरीकडे देशद्रोहाचे कलम लावून पोलिस शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापनाने केलाय.

Similar News