नवनीत राणांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह, लव जिहाद प्रकरणात वेगळीच माहिती आली समोर

Update: 2022-09-08 14:05 GMT

अमरावतीमधील एक 19 वर्षीय तरूणी लव जिहाद प्रकरणात बेपत्ता झाल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. तसेच या प्रकरणात पोलिसांनी आपला फोन रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप त्यांनी केला. यानंतर नवनीत राणा यांचा पोलिसांशी जोरदार वाद देखील झाला होता. पण आता याप्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

बेपत्ता झालेली तरुणी साताऱ्यामध्ये पोलिसांना रेल्वे स्टेशनवर सापडली. त्यानंतर सातारा पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अमरावती पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही मुलगी एकटीच होती, तिच्यासोबत कुणीही नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एवढेच नाही तर ही तरुणी आपल्या घरातून रागाच्या भरात स्वत: हून निघून गेली होती, अशी माहिती तिने सातारा पोलिसांना दिल्याची माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली आहे.

पोलिसांच्या या माहितीमुळे नवनीत राणा यांच्या लव जिहादच्या आरोपावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकट्या नवनीत राणाच नाही तर भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, खासदार अनिल बोंडें यांनीही यासंदर्भात केलेल्या लव जिहादच्या आरोपावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान अमरावती पोलिसांचे पथक त्या तरुणीला साताऱ्यामधून घेऊन निघाले आहेत. गुरूवारी हे पथक अमरावतीमध्ये दाखल होणार आहे. अमरावतीमध्ये आल्यानंतर तिच्या चौकशीमधून अधिक माहिती मिळू शकेल असेही पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी सांगितले.

Tags:    

Similar News