इगतपुरी रेव्ह पार्टी : बॉलिवूडमधील 4 अभिनेत्रींसह सर्व आरोपींना पोलीस कोठडी
राज्यात कोरोनामुळे निर्बंध लागू केलेले असतानाही उच्चभ्रू वर्गातील काही जणांनी इगतपुरीमधील एका बंगल्यात रेव्ह पार्टी केल्याचे उघड झाले आहे. इगतपुरीमध्ये पोलिसांनी छापा घालून कारवाई केलेल्या या रेव्ह पार्टी प्रकरणी एकूण 31 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 4 आरोपीनां नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित 25 जणांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये सर्व जण हे उच्चभ्रू वर्गातील आहेत. यामध्ये बॉलिवूडमधील 4 तर बिग बॉस फेम एका अभिनेत्रीचा समावेश आहे.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज विलातील एका बंगल्यात २७ जून रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड कून 22 जणांना ताब्यात घेतले होते. पण आता या रेव्ह पार्टीत सहभागी असणाऱ्या व्यक्तींची संख्या 31 वर गेली असून त्यांना सोमवारी इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आले.
या रेव्ह पार्टीतमध्ये मुंबईतील मोठमोठ्या लोकांच्या मुलांचा यात सहभाग असल्याने इगतपुरी शहरात तर्क वितर्कांना वेग आला आहे. या कारवाईत ड्रग्ज , हुक्का, मादक द्रव्य, तसेच विदेशी दारु आढळली, तर इथे उपस्थित असलेल्या तरुण-तरुणी बिभत्स अवस्थेत, तोकड्या कपड्यांमध्ये आढळले होते. या रेव्ह पार्टी १० पुरुष आणि १२ महिलांचा समावेश होता. त्यात आता वाढ झाली असून एकूण 31 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार महिला बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या व एका महिलेने बिग बॉस शोमध्ये काम केले आहे.
सोमवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रमुख 7 आरोपींपैकी 4 आरोपी ताब्यात आहेत तर 3 आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात पियुष भोगीलाल शेठीया (वय41), विक्रोळी, हर्ष शैलेश शाह(वय 27) घाटकोपर, नीरज ललित सुराणा ( वय 34) सांताक्रूझ, नायजेरियन ड्रग माफिया उमाही अबोणा पीटर (वय35), मिरा रोड, ठाणे अशा 4 जणांना 9 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामधील नसीम अलिम शेख, बांद्रा, सैफ नामक व्यक्ती, मुंबई व स्काय ताज विलाचा मालक रणवीर सोनी असे तीन जण फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी एक पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. सरकारी वकील मिलिंद नेर्लेकर यांनी न्यायाधीशांसमोर बाजू मांडताना नायजेरियन ड्रग माफिया याच्या अटकेमुळे मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे वीला (बंगला) मालकासह 3 जणांचा शोध घेण्यासाठी इतर 4 आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली ती न्यायाधीशांनी मान्य केली.