'जितेंद्र... सात वाजता उठायचं नाही तर, कामाला लागायचं'

Update: 2020-02-08 10:34 GMT

पुण्यातील झोपड़पट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नुतन कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंञी अजित पवारांच्या हस्ते झालं. 'झोपू'च्या पुणे कार्यालयाचे उद्घाटन झाले असे जाहीर करतो, या कार्यालयाला 12 लाखांचं भाडं आहे हे लक्षात ठेवा. असा टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिकाऱ्यांना लगावला. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही या कार्यक्रमाला उपस्थित होते. महापौर मुरलीधर मोहोळ, विधान परिषद उपसभापती नीलमताई गोऱ्हे, खासदार संजय काकडे हेदेखील उपस्थित आहेत. विकासकामांच्या दप्तर दिरंगाईवरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सर्वांसमक्ष जाब विचारल्याने त्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचं पाहायला मिळालं.

“अधिकाऱ्यांनी फार नियमांवर बोट ठेऊन चालू नका, त्यातून व्यवहारी मार्ग काढा, मी तर आता झोपूंच्या प्रकल्पांचा दर आठवड्यालाच आढावा घेणार आहे. काम चांगलं झालं तर किरकोळ चुकाही पोटात घेऊ पण कामं झाली नाहीतर साईड पोस्टिंगचा पर्याय वापरू” अशी प्रेमळ ताकिद अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिली.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) यांनी आपल्या भाषणादरम्यान “अजितदादा, पुण्यातले यापुढचे कार्यक्रम जरा उशिरा लावा, म्हणजे आमची झोप पूर्ण होईल” अशी विनंती केल्यावर कार्यक्रमात हशा पिकला. यावर अजित पवारांनीही “सूर्यमुखी असणाऱ्यांनी जरा लवकर उठायची सवय लावून घ्या. जितेंद्र तू सात ऐवजी पहाटे 4 ला ठाण्याहुन निघायला हवं होतं. सात वाजता उठायचं नाहीतर कामाला लागायचं” असा सल्ला जितेंद्र आव्हाडांना दिला. टीडीआरच्या बाबतीत पुण्याची मुंबईशी बरोबरी होऊ शकत नाही. दोन्ही शहरांची परिस्थिती वेगवेगळी आहे असं सांगत अजित पवारांनी आव्हाडांचा मुद्दा खोडुन काढला.

Similar News