महाराष्ट्राच्या राजकारणातील 'दादा'

Update: 2019-10-30 14:36 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी पुन्हा एकदा अजित पवार (ajit pawar)यांची निवड करण्यात आली. अर्थात ही निवड होणं अपेक्षित होतं. २०१४ च्या विधानसभेतही अजित पवार यांनी पक्षांच्या गटनेतेपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे १ लाख नाही तर तब्बल १ लाख ६५ हजारांच्या मताधिक्याने त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अलीकडच्या काळातील 'मास लीडर' आहेत. त्यांच्या राजकारणाभोवती शरद पवार यांचं वलय असलं तरी त्यांनी आपली स्वतःची प्रतिमा आणि शैली तयार केली आहे. राज्यातील राष्ट्रवादीचा मोठा मतदान हा अजित पवारांमुळेच पक्षासोबत आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला समजणारा आणि कृषी, अर्थ, उद्योग, सहकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा अभ्यास असणारा त्यांच्यासारखा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही असं अनेकांचं मत आहे. ग्रामीण भाषेचा लहेजा, वक्तृत्वावर उत्तम पकड असं दुहेरी समीकरण अजित पवारांकडे आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचा स्वतंत्र फॅनबेस आहे. आणि हा बेस फक्त सभांपुरता मर्यादित न राहता मतांमध्येही परावर्तित होतो हे विशेष.

पवार कुटुंबाचं मूळ गाव बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण अजित पवार यांचा जन्म त्यांच्या आजोळी म्हणजे नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली या गावात झाला. त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षणही इथंच झालं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्याला सुरुवात केली.

सहकाराच्या माध्यमातून अजित पवार यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८२ बारामतीतील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली आणि तिथून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.

१९९१ साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग ६ वेळा बारामती मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.

१९९९ साली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आल्यानंतर विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.

२००४ साली आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते. २००४ साली ते पुण्याचे पालकमंत्री झाले. त्यानंतर २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असेपर्यंत १० वर्षे ते पुण्याचे पालकमंत्री होते.

२०१० मध्ये अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांच्याकडे वित्त, नियोजन, ऊर्जा अशी खाती होती. यावेळी एका जाहीर सभेत केलेल्या एका विधानाने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर अजित पवारांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आत्मक्लेश केला होता.

राजकारणाबरोबरच शिक्षण, सहकार, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातही अजित पवारांचं काम आहे. विद्या प्रतिष्ठान, रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अशा शिक्षण संस्थांमध्ये ते विश्वस्त, अध्यक्ष आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांचा अनुभव आहे. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते.

महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अशा क्रीडा संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय आणि अजूनही पाहत आहेत.

असं हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व सलग सहव्यांदा विधानसभेत निवडून गेलं आहे. उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहीचलेल्या अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा आहे. आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणं अनुकूल राहिली तर अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी नक्कीच जोर लावतील.

Similar News