सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Update: 2020-08-04 14:29 GMT

अभिनेत सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणात आता आरोप प्रत्यारोप होत असताना यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न काही जणांनी केला आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी स्वत: निवेदन केले आहे. आदित्य ठाकरेंनी काय म्हटले आहे ते पाहूया...

“हे तर गलिच्छ राजकारण, पण मी संयम बाळगलाय !“

कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजलेला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोणाचा पराभव करण्यासाठी शर्थ करत आहे. बहुदा महाराष्ट्र सरकारचे यश लोकप्रियता ज्यांना खूपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तीश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. हे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे.

मुळात यासर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही सिनेसृष्टी म्हणजे बॉलीवूड हे मुंबई शहराचा एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू दुर्दैवी आणि तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे. पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवून तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मी हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या, ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापी होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांना द्यायला हवी. पोलीस नक्की त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नावर मी आजही संयमाने स्वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेक करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कोणी राहू नये. तूर्त इतकेच !

Similar News