सहकाराचा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहमदनगर मध्ये अवैध खासगी सावकारकी वाढली

Update: 2021-10-01 03:04 GMT

नगर तालुक्यातील रत्नापूर येथील खासगी सावकाराच्या घरावर सहकार विभागाने ३० सप्टेंबर ला छापा टाकून खासगी सावकारकी संदर्भातील काही आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत करत गुन्हा दाखल केला आहे.

खासगी सावकारकीबाबत जामखेड पोलिस ठाण्यात गेल्या आठ दिवसांत तीन गुन्हे तर सहकार विभागाकडूनही एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे , खासगी सावकाराविरोधात आठ दिवसांत चार गुन्हे दाखल झाल्याने खासगी सावकारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. याप्रकरणी आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील एका विरूद्ध जिल्हा उपनिबंधक नगर कार्यालयाकडे अवैध सावकारकी करत असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी कारवाई करण्यासाठी जामखेड येथील साहाय्यक निबंध देविदास घोडेचोर, सहकार अधिकारी साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बबन वराट यांच्या राहत्या घरावर पोलीस बंदोबस्तासह धाड टाकून घराची झडती घेतली. या झडतीमध्ये खासगी सावकारकी संदर्भात आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली. त्यानुसार वराट यांच्या विरोधात अवैध सावकारकी अधिनियम २०१४ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान जिल्ह्यातील अवैध सावकारांच्या जाचाने त्रस्त झालेल्या नागरिकांनी स्वतः होऊन पुढे येत पुराव्यासह तक्रार द्यावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी केले आहे.दरम्यान सहकाराचा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात खासगी सावकारकी बोकळली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, यावर संबंधित विभागाने जोरदार कारवाई देखील सुरू आहे. मात्र, अनेकजण या सावकारकी विरोधात पुढे येताना दिसत नाही , त्यामुळे पीडित नागरिकांनी पूढे येत तक्रार केल्यास अवैध सावकारकी विरोधात कठोर कारवाई केली जाईल असं जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News