रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविल्याप्रकरणी आरोपी निर्दोष

Update: 2020-01-25 09:07 GMT

रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज (Ch. Shivaji Maharaj) यांच्या समाधीच्या मागे असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेड च्या (Sambhaji Brigade) कार्यकर्त्यांनी २०१२ साली हटवला होता. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ७३ जणांना पोलिसांनी अटक केली होती. अनेक दिवसांपासून चाललेल्या खटल्याचा अखेर माणगाव सत्र न्यायालयात निकाल लागला असून पुराव्याअभावी 73 जणांची सत्र न्यायाधीश जहांगीर यांनी निर्दोष सुटका केली आहे. या निकालाच्या अनुषंगाने माणगाव न्यायालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या प्रकरणात संभाजी ब्रिगेडच्या ७३ कार्यकर्त्यांना महाड पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर दरोडा घालण्याचा आणि पोलिसांना मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी वापरलेल्या गाड्याही जप्त केल्या होत्या. महाड न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली होती. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसविला होता.

महाड न्यायालयातून हा खटला माणगाव न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. माणगाव न्यायालयात वाघ्या कुत्रा हटविल्या संदर्भात आज खटला सुरू होता. यावेळी न्यायालयाने कार्यकर्त्यांविरोधात कोणताही पुरावा नसल्याने सर्व आरोपींना निर्दोष सोडले आहे. त्यामुळे आठ वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला असून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेली आहे.

Similar News