मुंबईकरांना खुशखबर! एसी लोकलचे दर होणार स्वस्त,दानवेंची मोठी घोषणा

Update: 2022-04-29 09:55 GMT

सध्या मुंबईकर उष्णतेने हैरान झाले आहेत.यावरुनच त्यांना दिलासादायक बातमी मिळणार आहे. मुंबईकरांना एसी लोकलच्या दराबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. तिकीटांच्या दरामध्ये ५० टक्के घट करण्याची घोषणा मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. त्यांनी आज भायखळा रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

मुंबईसाठी लोकल ही लाईफलाईन आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेनं त्यामध्ये सुधारणा करत एसी लोकल सुरू केली. पण, एसी लोकलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार वारंवार प्रवाशांकडून केली जात होती. त्यामुळे एसी लोकलला प्रतिसाद देखील मिळत नव्हता. याबाबत मध्ये रेल्वेकडून ५ हजार प्रवाशांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यावेळी जवळपास ९८ टक्के प्रवाशांनी एसी लोकलचे दर कमी करण्याची मागणी केली होती. आता एसी लोकलच्या दरात घट केल्यामुळे सर्वसामान्यांना देखील एसी लोकलच्या प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

रम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसी लोकलचे दर कमी केल्यामुळे रावसाहेब दानवे यांचे आभार मानले. केंद्र सरकारने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे आता राज्य सरकारने व्हॅट कमी करून इंधनदरवाढीपासून जनतेला दिलासा द्यावा, असं फडणवीस म्हणाले.

Tags:    

Similar News