#WorkFromHome – वर्क फ्रॉम करत आहात? मग ही बातमी नक्की वाचा !

Update: 2020-06-27 06:19 GMT

लॉकडाऊनमुळे सध्या अनेक एकीकडे वर्क फ्रॉम होम धोरण यशस्वी होत असताना दुसरीकडे मात्र कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तंदुरूस्तीचा प्रश्नही समोर आला आहे. बराच वेळ एकाच ठिकाणी बसून सतत काम करावे लागत असल्याने पाठदुखीची समस्या बळावू लागलीय. याचा प्रत्यय नुकताच आलाय. लॉकडाऊनच्या या कालावधीत अधिक तास बसून काम करावे लागत असल्याने मुंबईतील एका व्यक्तीच्या मणक्यात गाठ तयार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भूपेश अंकोलेकर (वय ४०) असे या रूग्णाचे नाव असून ते मुंबईत राहणारे आहेत. भूपेश हे व्यवसायाने अभियंता आहेत. बैठ्या जीवनशैलीमुळे अनेक महिन्यांपासून त्यांना पाठदुखीची समस्या जाणवत होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये घरीच बसून काम करावे लागत असल्याने पाठीचे दुखणे अधिकच वाढू लागले. दुखणं असह्य झाल्याने कुटुंबियांनी त्यांना मे च्या पहिल्या आठवड्यात मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

एक्स-रे आणि एमआरआय चाचणीनंतर त्यांच्या पाठीच्या कण्यात गाठ असल्याचं निदान झालं. ही गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढणे गरजेचं होते. डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया करून पाठीच्या मणक्यातून गाठ काढली. ही गाठ 3.5 सेंटिमीटर इतकी मोठी होती.

यासंदर्भात बोलताना ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश भालेराव म्हणाले की, ‘‘पाठीच्या कण्यातील ही गाठ हाडाच्या आत चिटकून होती. मज्जातंतूला नुकसान होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे खूपच अवघड होतं. परंतु, डॉक्टरांनी हे आव्हान स्विकारून मायक्रोस्क्रोपीद्वारे (दुर्बिणी) प्रक्रिया करून पाठीच्या मणक्यातील ही गाठ यशस्वीरित्या गाठली. या शस्त्रक्रियेमुळे रूग्णाला पाठीच्या दुखण्यातून कायमस्वरूपी सुटका मिळाली आहे.’’

वोक्हार्ट रूग्णालयातील कन्सल्टंट न्यूरोसर्जन डॉ. अश्विन बोरकर म्हणाले की, ‘‘पाठीच्या कण्यातून गाठ काढणे ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. साधारणतः चार तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. या शस्त्रक्रियेनुसार रूग्ण शुद्धीवर आल्यावर कुठल्याही प्रकारची वेदना जाणवत नाही. दोन तासांनंतर तो दैनंदिन आयुष्य जगू शकतो. या रूग्णाला शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी घरी सोडण्यात आले आहे. आता या रूग्णाची प्रकृती ठणठणीत असून तो नियमित कामे करू लागला आहे.’’

रूग्ण भूपेश अंकोलेकर म्हणाले की, ‘‘पाठीच्या मणक्यात ट्यूमर(गाठ) असल्याचे निदान झाल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढणे हा एकच पर्याय होता. त्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढली. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आता मला या पाठीच्या दुखण्यातून सुटका मिळाली आहे. आता मी पूर्वीप्रमाणे आयुष्य जगू शकतोय.’’

एकूणच काम करत असताना आपली बसण्याची पद्धत, कितीवेळ सलग बसावे, त्याचबरोबर काही त्रास जाणवल्यास तातडीनं डॉक्टरांना गाठण्याची खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

Similar News