#Raigad : रायगड जिल्ह्याला महापुराचा तडाखा, महाडमध्ये भूस्खलनाचे ४३ बळी

Update: 2021-07-23 13:06 GMT

 राज्यातील अनेक भागात सध्या पावसाचा कहर सुरू आहे. याच परिस्थितीत रायगड जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एकूण ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी महाड तालुक्यातील तळई गावात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या गावात दरड कोसळल्याने त्याखाली ३२ घरं दबली गेली आहेत. यामध्ये ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. ३० जण अजूनही बेपत्ता आहेत. गोवेले सुतारवाडी येथे ५ जणांचा तर केवनाळे येथील ६ जणांचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला आहे.



 पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी येथे गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. या दुर्घटनेत सुमारे आठ ते दहा घरांचे नुकसान झाले असून आणखी काही घरे दरडींसोबत उतारावर वाहून गेली. गुरुवारी रात्री ही घटना कळल्यानंतर प्रशासनाने घटनेचा आढावा घेतला असता कापडे ते कामथे बोरघर रस्त्यावरील कापडे बुद्रुक येथील खांबेश्वरवाडीला जोडणारा पूल वाहून गेल्याचे दिसून आले. यावेळी दरडीच्या ढिगाऱ्याखालून केवनाळे येथून ६ जणांचे तर गोवेले सुतारवाडी येथील ५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर गोवेले सुतारवाडी येथील १०, केवनाळे येथील २ आणि कुंभार्डे येथील १ अशा १३ जखमींना बाहेर काढण्यात आले असून, या सर्वांना प्राथमिक उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडुन देण्यात आली आहे.



 


या दोन्ही ठिकाणी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांच्यासह विधानस परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, गिरीश महाजन हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी सुरू असलेल्या मदत व बचाव कार्याचा त्यांनी आढावा घेतला. प्रवीण दरेकर यांनी या ठिकाणाला भेट दिल्यानंतर ट्विट करुन माहिती दिली आहे.



 

शिवाय महाड तालुक्यात पुराने तैमान घातल्याने आता इथून लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे आहे. पुरामध्ये अडकलेल्या लोकांचे हेलिकॉप्टरने स्थलांतर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पण नागरिकांनीही आपापल्या घरांच्या छतावर किंवा उंच ठिकाणी जाऊन थांबले तर बचाव पथकांनी ते दिसू शकतील असे आवाहनही कऱण्यात आले आहे.

Tags:    

Similar News