बीड जिल्ह्यात डेंग्यूचा कहर, चार जणांचा मृत्यू

Update: 2021-10-30 09:15 GMT

बीड : कोरोना संकटाने गेल्या दोन वर्षांपासून थैमान घातलं आहे, एकीकडे कोरोना रुग्ण कमी होत असतानाच आता डेंग्यू, चिकनगुनिया आणि तापाच्या इतर आजारांनी नागरिकांना ग्रासल्य़ाच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात डेंग्यूने तीन जणांचा बळी घेतला आहे. बीड शहरातील मधुरा जोशी ही 21 वर्षांची तरुणी, पाटबंधारे विभागात काम करणारे सुर्यकांत माळी तर धारुर तालुक्यातील अनिल शिनगारे, ओम बाबासाहेब जगताप यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेक लोकांना डेग्युने ग्रासले आहे.

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, परळी, केज, धारूर, पाटोदा, गेवराई, आष्टी, शिरूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात तापाचे रुग्ण सापडत आहेत. लवकर बरे होण्यासाठी लोक शासकीय रुग्णालयात न जाता खाजगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचे दिसते आहे. जिल्ह्यातील शहरांमध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग व घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत असल्यामुळे मच्छरांचे प्रमाण वाढल्याचे नागरिक सांगत आहेत.

खाजगी रुग्णालयात रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात बिलं घेतली जात असल्याचीही तक्रार काही रुग्णांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी शेख रौफ यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, साथ रोगाच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाला याबद्दल स्वच्छतेची सूचना दिलेली आहे. ताप आलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. ज्या गावात रुग्ण आढळत आहेत, त्या गावातील लोकांच्या रक्ताचे नमुने विषाणु तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. ज्या ठिकाणी तापाचे रुग्ण आढळून येत आहेत या ठिकाणी त्यात सर्वेक्षण सुरू ठेवले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ग्रामपंचायतींना धूर फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांना आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा त्याचबरोबर घरात पाणी झाकून ठेवावे, कुंड्या कुलर यामधले पाणी साठले असेल तर ते रिकाम करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

सूर्यकांत माळी यांचे डेंग्युमुळे निधन झाले, यानंतर त्यांचा मुलगा सूरच सांगतो की, "शहरातील नागरिकांना विनंती आहे की डेंग्यू हा आजार सर्वसाधारण नसून त्याच्याकडे जर दुर्लक्ष झाले तर असे प्रकार घडतात. मी महाराष्ट्र शासन व भारत सरकारला विनंती करतो की साथीच्या आजारांबाबतचा अभ्यासक्रम शालेय शिक्षणात समाविष्ट केला जावा. त्यामुळे लहानपणापासूनच अशा आजारांबाबत जनजागृती होईले असे त्यांनी सांगितले. पण जिल्ह्यात ४ रुग्णांचा डेंग्युमुळे मृत्यू झाला असला तरी अजूनही आरोग्य व्यवस्था पाहिजे जशी जागृत झालेली दिसत नाहीये.

Tags:    

Similar News